राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या बैठकीत महाविकास आघाडीने भाजपसमोर राज्यसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याची भरपाई आम्ही विधानपरिषद निवडणुकीत करू, असे महाविकास आघाडीने सांगितले. मात्र, देवेंद्र फडणवीसांनी हाच उलट प्रस्ताव महाविकास आघाडीसमोर ठेवला. त्यामुळे या चर्चेत कोणता तोडगा निघू शकला नाही.
या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, राज्यसभा निवडणूक ही बिनविरोध होण्याची परंपरा आहे. त्यासाठी निवडणूक झाल्यास मोठ्याप्रमाणावर क्रॉस व्होटिंग होते, हा अनुभव आहे. राज्यसभेच्या तिसऱ्या जागेवरील भाजपचा दावा हा तर्कसंगत आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे आमच्यासाठी राज्यसभा महत्त्वाची आहे, हे आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितले. भाजपकडे ३० अतिरिक्त मते आहेत. आम्हाला केवळ ११ ते १२ मतंच कमी पडत आहेत. तर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडे मिळूनही ३० पेक्षा अधिक मतं नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांना आग्रहाने सांगितले की, विधान परिषदेची पाचवी जागा आम्ही लढवणार नाही. तुम्ही राज्यसभा निवडणुकीतून माघार घ्या. त्यावर महाविकास आघाडीचे नेते आम्ही आपापसांत चर्चा करुन कळवतो, असे सांगून बैठकीतून निघून गेल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
भाजपकडे १०६ आमदार आणि सहयोगी ७ असे ११३ जण कोणत्याही परिस्थितीत पाचव्या उमेदवाराला सही देणार नाहीत, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला. तसेच राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने माघार न घेतल्यास विधानपरिषदेची पाचवी जागाही बिनविरोध होणार नाही, त्यासाठी निवडणूक होईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
महाविकास आघाडीची नेमकी ऑफर काय?
महाविकास आघाडीकडे उरलेल्या मतांची संख्या जास्त आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत आमच्या उमेदवाराला संधी द्या, असे आम्ही फडणवीस यांना सांगितले. त्यासाठी भाजपच्या उमदेवाराने राज्यसभा निवडणुकीतून माघार घ्यावी, त्याची भरपाई आम्ही विधान परिषदेला करू, असे आम्ही त्यांना सांगितले.