व्हेंटिलेटरवर असलेल्या तरूणाचा मृत्यू…
आप्पा काळे हे, पत्नी एक अविवाहित मुलगी ,सून आणि विवाहित मुलगा या आपल्या कुटुंबियांसमवेत उचगाव शांतीनगर इथं राहतात. त्यांचा मुलगा अमेशला ह्दयविकार असल्यानं गेली दोन वर्षे तो व्हेंटिलेटरवरच घरी अंथरुणात पडून होता. त्याची घरची परिस्थिती बेताची असल्यानं त्यांनी वीज बिल भरले नव्हते. दरम्यान ३० मे रोजी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आप्पा काळे याच्या घरातील वीज पुरवठा बंद केला होता. त्यामुळे अमेश याला शेजारी राहणारे त्याचे चुलते दिलीप काळे यांच्या घरी ठेवलं होतं. मात्र, आज पहाटे संपूर्ण शांतीनगर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.त्यामुळं सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अमेश याचा घरी मृत्यू झाला.
नातेवाईकांनी घेतला आक्रमक पवित्रा…
वीज पुरवठा खंडित झाल्यानं व्हेंटिलेटरवर असलेल्या अमेश याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर इथं नेण्यात आला. याठिकाणी शांतीनगर परिसरातील फासेपारधी समाज बांधव महिलांसह मोठ्या संख्येने जमा झाले. यावेळी आक्रमक झालेल्या महिलांनी महावितरणच्या विरोधात आक्रोश करण्यास सुरुवात केली. अमेशच्या मृत्यूला महावितरणच जबाबदार आहे, असं सांगत महावितरणाचे अधिकारी आल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला.
मृतदेह ताब्यात घेण्यास नकार…
यावेळी, सायंकाळी महावितरणचे कर्मचारी या ठिकाणी आले मात्र अधिकारी न आल्याने जमाव आधीकच आक्रमक झाला होता. याठिकाणी गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले पोलीस घेऊन आले होते. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र उशीरापर्यंत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला नव्हता सीपीआर इथल्या शवविच्छेदन गृहासमोर मोठा जमाव उशिरापर्यंत थांबून होता.