उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी चिंचवडमध्ये होते. त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन पार पडले तसेच राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळावा देखील पार पडला. अजित पवार पुण्यात किंवा पिंपरी चिंचवडमध्ये असले की जरा जास्त खुलतात. याचाच प्रत्यय आज पुन्हा पिंपरी चिंचवडकरांना पुन्हा आला. कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी चौफेर फटकेबाजी केली. तरुण कार्यकर्त्यांना त्यांनी चिमटे काढले तर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठांना सल्ले दिले.
“कुणीही काहीही बडबडतं… मी बोलताना तर दहावेळा विचार करुन बोलतो. मागे एकदा चुकलो तर जबरदस्त किंमत मोजलीय. सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी प्रीतिसंगमावर जाऊन आत्मक्लेष केला. आता चुकायचं नाय… आता चुकायचं नाय, असं सारखं म्हणत असतो. तेव्हापासून आजतागायत चुकलो नाही”, अशी फटकेबाजी अजित पवारांनी केली.
यानंतर उपस्थित राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मात्र यावरही अजित पवारांनी चिमटा काढला. “नेता टाळ्या पडल्या की खूश होऊन घसरायला लागतो, पण तुम्ही कितीही टाळ्या वाजवा, मी आता चुकणार नाही. भाषण करत असताना माझं मलाच मी सांगत असतो घसरायचं नाय, घसरायचं नाय….” अशी अशी टोलेबाजी अजितदादांनी केली.
राष्ट्रवादीच्या तरुण कार्यकर्त्यांना अजितदादांच्या कोपरखळ्या
“पिंपरी चिंचवड शहरामध्ये गृह खात्याच्या वतीने ८८ चौकांमध्ये २८७ कॅमेरे आणि मनपाच्या वतीने २२०० कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे शहरात ७ हजार ६०० कॅमेरे बसणार आहेत. तुम्ही रात्री कुठे जाता, दिवसा कुठे जाता, कुणाबरोबर फिरता, गार्डनमध्ये कुठं आणि कुणासोबत गुलूगुलू करता, सगळं कळणार आहे…”, अशा कोपरखळ्या अजित पवार यांनी उपस्थित तरुण कार्यकर्त्यांना मारल्या.