राज्यसभा निवडणुकीच्या सहा जागांनी गेली दोन आठवडे राज्याचं राजकारण तापलेलं असताना राज्यातील विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. २० जूनला मतदान होणार असून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक ठरणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सदाभाऊ खोत यांच्यासह १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीतून शिवसेना आणि राष्ट्रवादीचेही प्रत्येकी दोन आमदार विधान परिषदेत जातील. तर काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येईल. तर भाजपचे ४ आमदार निवडून येऊ शकतात. अशा परिस्थितीत या निवडणुकीत कोणाला संधी मिळणार आणि कोणाला डच्चू? याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच भाजपमधल्या संभावित उमेदवारांची नावे चर्चेत आली आहेत.
पंकजांना संधी मिळणार?
राष्ट्रवादीचे नेते, तत्कालिन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा जोरदार पराभव केला. त्या पराभवाला आता तीन वर्ष झाले आहेत. तेव्हापासून पंकजा मुंडे पक्षात एकट्या पडल्याचं चित्र आहे. मागील दसरा मेळाव्यात त्यांनी स्वपक्षीयांवर टीकेचे बाण सोडून मनातला राग व्यक्त केला. आपल्या मनातील खदखद व्यक्त केल्यानंतर काही दिवसांत त्यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. नंतरच्या काळात त्या पक्षात पुन्हा सक्रिय झाल्या. पाच राज्यांच्या झालेल्या निवडणुकीत देखील पंकजांनी पक्षाने सांगेल तिथे जाऊन प्रचार केला.
दरम्यान, मधल्या काळात पंकजांनी स्वपक्षियांशी जुळवूनही घेतलं. तर ओबीसींचं राजकीय आरक्षण कोर्टाने सध्या संपुष्टात आल्यानंतर सरकारला अडचणीत आणणारा ओबीसी चेहरा म्हणून पंकजांकडे भाजप पाहू लागलं. त्याच उद्देशातून ओबीसी आरक्षणाच्या कुठल्याही घडामोडींवर पंकजा माध्यमांत येऊन सरकारवर टीकेचे बाण सोडू लागल्या. ओबीसींच्या मुद्द्यावर सरकारविरोधात रोष निर्माण करायचा असेल तर पंकजा ती भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडू शकतात, त्याचमुळे त्यांना उमेदवारी देण्याचा पक्ष विचार करु शकतो, अशी शक्यता राजकीय जाणकारांनी बोलून दाखवली.
गेल्या काही काळात पंकजा यांचा पक्षातला अॅक्टिव्हनेस चांगलाच वाढला आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे स्वपक्षीयांवर ताशेरे ओढण्याचं प्रमाण देखील त्यांनी कमी केलंय. अशा काळात पंकजा यांना संधी मिळू शकते.
राम शिंदे, हर्षवर्धन पाटील तसंच चित्रा वाघ यांचं पुर्नवसन होणार?
दुसरीकडे राम शिंदे, हर्षवर्धन पाटील तसंच चित्रा वाघ यांचं भाजपला पुर्नवसन करायचं आहे. रोहित पवार यांच्याविरोधात लढण्यासाठी भाजपला राम शिंदे यांना रसद पुरवायची आहे. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लढण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनाही भाजपला बळ द्यायचं आहे. त्यासाठी विधानपरिषद निवडणुकीची नामी संधी आहे. त्यामुळे राम शिंदे, हर्षवर्धन पाटील यांनाही संधी मिळू शकते.
चित्रा वाघ गेल्या दोन वर्षापासून महाविकास आघाडीविरोधात सातत्याने भूमिका मांडत आहेत. तीन पक्षांच्या सरकारवर टीकेची त्या एकही संधी सोडत नाहीयेत. तसेच ओबीसी नेत्याला विधान परिषदेवर संधी दिली जावी, या मतप्रवाहातून चित्रा वाघ यांनाही संधी मिळू शकते. जेणेकरुन विधान परिषदेत त्या भाजपची जोरदार आणि आक्रमकपणे बाजू मांडू शकतील.