शिरोळ तालुक्यातील हेरवाड या गावाने विधवांना सन्मानाची वागणूक देण्याचा ठराव मे महिन्यात केला. त्याचा आदर्श केवळ महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक, गोवा यासह अनेक गावांनी घेतला. विविध राज्यातील गावांनी तसे ठराव केले. सर्व गावांनी विधवांना मिळणारी अपमानास्पद वागणूक बंद करावी असा निर्णय राज्य सरकारने घेतला. यामुळे राज्य आणि देशपातळीवर हेरवाड गावाचे कौतुक झाले. त्याच पार्श्वभूमीवर आता टाकळवाडी गावानेही विधवांच्या हस्ते मंदिराची वास्तूशांती केली.
गावाने वेगळा आदर्श राज्यासमोर ठेवला…
टाकळीवाडी येथील चर्मकार समाज बांधवांच्या ताई-बाई मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. शुक्रवारी या मंदिराच्या वास्तुशांती, पूजा-अर्चा, देवीची ओटी भरणे, हळदीकुंकु आदी विधिवंत कार्यक्रम विधवा महिलांच्या हस्ते करण्यात आले. मंदिरात कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात विधवांना सहभागी करून घेतले जात नाही. ही अनिष्ट प्रथा बंद करत त्यांना मान देण्याचा केवळ निर्णय घेतला नाही तर प्रत्यक्ष कृती करत या गावाने वेगळा आदर्श राज्यासमोर ठेवला आहे.
महिलांना पुनर्विवाहासाठी १० हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा…
ग्रामपंचायतीने मंदिरात सुरू असलेल्या या सामाजिक उपक्रमाची दखल घेत विधवा प्रथा बंदीचा ठराव लवकरच मंजूर करून विधवा महिलांच्या सबलीकरणासाठी ग्रामपंचायत प्रशासन प्रयत्न करणार असल्याचे सांगत विधवा झालेल्या महिलांना पुनर्विवाहासाठी १० हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा ग्रामपंचायत सदस्य सदस्य चिंगरे यांनी केली. यावेळी सरपंच लक्ष्मीबाई बिरणाळे, उपसरपंच बाजीराव गोरे, आप्पासाहेब निर्मळे, रमेश निर्मळे, मोहन निर्माळे, मल्लापा निर्मळेसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.