मुंबई: ‘कालपर्यंत ज्या राज्यानं पोटापाण्याची सोय केली, ते राज्य सोडून पळून जाणे ही बेईमानी आहे. जे संकटकाळात येथे राहिले तेच महाराष्ट्राचे भूमिपुत्र. जे गोंधळ घालून पळून जात आहेत ते पुन्हा येथे येणार नाहीत याची तजवीज प्रशासनाने आता केलीच पाहिजे, अशी आग्रही मागणी शिवसेनेनं केली आहे.

मुंबईतील वांद्रे इथं मंगळवारी घडलेल्या घटनेवर शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. या घटनेवरून राजकारण करणाऱ्या विरोधकांवर टीकेची झोड उठवतानाच परप्रांतीय मजुरांनाही खडे बोल सुनावण्यात आले आहेत. ‘मुंबईसारखी शहरे ‘बंद’ पडतात तेव्हा देशाचे पोट उपाशी राहते याचा अनुभव सध्या येत आहे. देशाचा आर्थिक डोलारा कोसळतो आहे. पैशाचे सोंग आणता येत नसल्यामुळं राज्य चालवणे जिकिरीचे काम आहे. अशा परिस्थितीत कालपर्यंत पोटापाण्याची व्यवस्था करणारं राज्य सोडून पळून जाणं ही बेईमानी आहे, असा हल्लाबोल शिवसेनेनं केला आहे. ‘वांद्रे इथं पाच-दहा हजार लोक जमवले गेले, त्यांचे कूळ अणि मूळ शोधून काय करायचे ते पाहावे लागेल. त्यांनी ‘लॉक डाऊन’चे सर्व नियम आणि कायदे धाब्यावर बसविले. सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजविले. महाराष्ट्राच्या जिवाशीच खेळण्याचे हे प्रयत्न होते, असा संताप व्यक्त करण्यात आलाय.

वाचा:

‘मुंबईत मोठ्या संख्येने परप्रांतीय मजूर अडकले आहेत व त्यांना आपल्या घरी जायची ओढ लागली आहे. पण आपल्या राज्यात निघालेल्या या लोकांना त्यांच्या राज्यांमध्येही कोरोनाच्याच संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. महाराष्ट्रात निदान दोन वेळच्या जेवणा-खाण्याची तरी सोय होत आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे एका आस्थेने सगळ्यांची काळजी घेत आहेत. त्यामुळे स्वतःच्या सुरक्षेसाठी या मंडळींनी ते जेथे आहेत तेथेच राहणे सोयीचे आहे, असंही अग्रलेखात नमूद करण्यात आलंय.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here