Maharashtra Yavatmal News : तुम्हाला किडनीग्रस्त आजारी (Kidney Affected Village) गाव माहीतीये का? हो, तुम्ही बरोबर ऐकलं. महाराष्ट्रातील (Maharashtra) एक गाव चक्क किडनीग्रस्त गाव म्हणून ओळखलं जातं. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वडद (Wadad) हे किडनीग्रस्त आजारी रुग्णांचं गाव म्हणून ओळखलं जातं. या गावाचं दुर्दैवं इतकं की, संपूर्ण गावाच्या लोकसंख्येपैकी तब्बल 70 टक्के रुग्ण किडनीच्या आजारांनी त्रस्त आहेत. याचं कारण आहे, फ्लोराईड क्षारयुक्त अशुद्ध पिण्याचं पाणी. 

फ्लोराईड क्षारयुक्त अशुद्ध पिण्याच्या पाण्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील ‘वडद’ हे गाव किडनीग्रस्त गाव म्हणून ओळखलं जातं. माजीमंत्री मनोहर नाईक यांच्या निधीतून या गावात जलशुद्धीकरण यंत्रणा उभारण्यात आली होती. पण गेली सहा वर्ष ही यंत्रणा बंद आहे. 

गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळत नसल्यानं त्यांना किडनीच्या आजारांनी ग्रासलं आहे. संपूर्ण गावालाच यामुळे मरण यातना सहन करत जीवन जगावं लागत आहे. गावात या आजाराचे 70 टक्के रुग्ण आहे. हा आरोप्लान्ट 2015 मध्ये तब्बल अकरा लाख रुपये खर्च करून बसविण्यात आला होता. तो सहा वर्षांपासून बंद आहे. यावर सहा लाख रुपये खर्च करूनही काम अर्धवट करण्यात आलं होतं. गावात आतापर्यंत किडनीच्या आजारांमुळे तब्बल 40 रुग्णांचे जीव गेले आहेत.  

पुसद विधानसभासभा मतदारसंघातील वडद हे घनदाट जंगलाला लागून असलेलं आदिवासीबहुल गाव आहे. या गट ग्रामपंचायतीत सेवानगर बंजारा तांडा समाविष्ट आहे. गावची लोकसंख्या जवळपास सात हजार एवढी आहे. मात्र, हे गाव पाण्याची विपुलता असूनही फ्लोराईड क्षारयुक्त पाण्यामुळे शापीत ठरलं आहे. सरकारी नोंदीनुसार, या गावातील जवळपास 40 किडनीग्रस्त रुग्ण दगावले आहेत. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी या गावकऱ्यांचा प्रश्‍न तत्कालीन मंत्री मनोहर नाईक यांच्यासमोर मांडला होता. त्यांनी तत्परतेनं लक्षावधी रुपयांचा निधी आरओ यंत्रणा उभारण्यासाठी उपलब्ध करून दिला. यातून आरओ यंत्रणेतील सुविधा असलेले पहिले गाव वडद ठरलं खरं. पण ही आरओ यंत्रणा दुरुस्तीअभावी ठप्प झाली. त्यामुळे पुन्हा फ्लोराईडयुक्त दूषित पाणी पिण्याची पाळी नागरिकांवर आली.

सद्य:स्थितीत नागरिक दहा लिटरच्या कॅनला 20 रुपये मोजून ब्रह्मी गावातून पिण्याचं पाणी आणत आहेत. सरपंच स्वाती भारत पडघने यांनी सरपंच पदाचा प्रभार नव्यानं हाती घेतल्यानंतर बंद पडलेली आरओ यंत्रणा सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. ही यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी ग्रामसेवकांनी परस्पर एजन्सीला काम दिलेलं होतं. प्रत्येकी तीन लाखांचे दोन धनादेश या एजन्सीला देण्यात आले होते. पण प्रत्यक्षात दुरुस्तीचं काम अर्धवटच आहे. नागरिकांनी शुद्ध पेयजल उपलब्ध करून द्यावं, अशी मागणी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना सरपंच स्वाती पडघने यांनी केली आहे.

गावात शुद्ध पाणी नसल्यानं अनेकांना किडनी आजारांचा सामना करावा लागत आहे. पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जात नाही. आतापर्यंत 40 लोकांचा किडनी आजारानं मृत्यू झाला आहे. आरओ प्लांट बंद आहे.
गावातील लोकांना किडनीचा आजार जडला आहे. अनेकांना हाच त्रास आहे. पाण्यात क्षार आहे. जलशुद्धीकरण यंत्र बंद आहे. पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. गावात 70 टक्के रुग्ण गंभीर आहेत. उपचारासाठी पैसे कुठून आणावे हा प्रश्न आहे. शेती नाही, मजुरी करून उदरनिर्वाह करावा लागतो. नांदेड जिल्ह्यात जाऊन उपचार करावा लागतो, असं वडदमधील गावकरी सांगतात. 

दरम्यान, दोन पद्धतींनी सहा महिन्याला पाण्याची तपासणी केली जाते. फ्लोराईडयुक्त पाण्याचे स्रोत आढळून आल्यास पाण्याची पर्यायी व्यवस्था केली जाते. गावात किडनीचे रुग्ण आढळून येते असल्यास तालुका आरोग्य अधिकारी यांची टीम पाठवण्यात येईल. किडनीच्या आजाराचा नेमका शोध घेण्यात येईल. मेडिकलमध्ये अथवा बोगस डॉक्टरकडे जाऊन कुणीही औषधी घेऊ नये, असं आवाहन यवतमाळच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना केलं आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here