गत दहा वर्षांपासून हर्षवर्धन सपकाळ राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. उदयपूर शिबिरातील घोषणा पत्राच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उपाध्यक्षपदाचा आपला राजीनामा पक्षाकडे गत आठवड्यात सादर केला. ऑगस्ट २०१३मध्ये मणिशंकर अय्यर यांच्याकडील राजीव गांधी पंचायत राज संघटनेचा कार्यभार तत्कालीन खासदार मीनाक्षी नटराजन तथा हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सोपविण्यात आला होता. २०१४मध्ये सपकाळ विधानसभेत पोहोचल्यानंतर सहा महिन्यांच्या आत त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव नियुक्त करण्यात आले होते. सुरुवातीची अडीच वर्षे गुजरातपाठोपाठ मध्य प्रदेशची महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. या कार्यात व्यस्त असल्याने बराच काळ त्यांना प्रभारी राज्यामध्ये व राजीव गांधी पंचायत राज संघटनेस देणे भाग पडले होते. याचा राजकीय फटका २०१९च्या निवडणुकीत त्यांना बसला होता. विधानसभा निवडणुकीच्या पराभवाच्या पश्चात एक वर्षाने २०२०मध्ये सचिवपदावरून कार्यमुक्त करीत संपूर्ण वेळ राजीव गांधी पंचायत राज संघटनेत काम करण्याच्या सूचना पक्षपातळीवर त्यांना मिळाल्या होत्या. पुढे सव्वा दोन वर्षांनी मात्र पंजाबच्या बिघडलेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पुनश्च अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव नियुक्त करण्यात आले होते.