मरोळ पाइपलाइन येथील एका झोपडपट्टीतील दूधवाल्याला ताप आल्यानंतर घशात खवखव होऊ लागल्याने त्याची तपासणी करण्यात आली असता त्याचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. या दूधवाल्याला करोनाची लागण झाल्याचं आढळून आल्यानंतर तो राहत असलेला परिसर सील करण्यात आला आहे. तसेच त्याचे कुटुंबीय आणि तो राहत असलेल्या चाळीतील लोकांना क्वॉरंटाइन करण्यात आले असून त्यांच्या तपासण्याही सुरू आहेत. हा दूधवाला अनेक लोकांच्या संपर्कात आला असणार. गेल्या १४ दिवसांत तो कुणाकुणाच्या संपर्कात आला होता. याची माहिती घेण्यात येत असून त्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे. मरोळ पाइपलाइन झोपडपट्टीत करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पालिका प्रशासानाकडून विशेष खबरदारी घेतली जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यातील करोनाबाधितांचा आकडा २९१६वर गेली असून राज्यातील मृतांचा आकडा १८७वर गेला आहे. तर मुंबईतील करोना रुग्णांची संख्या १७५६वर गेली आहे. मुंबईत आतापर्यंत ११२ जणांचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times