अहमदनगर : पुणतांबा येथील शेतकरी आंदोलनात अखेर आज चौथ्या दिवशी सकारात्मक तोडगा निघाला आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांनी पुणतांब्यात येऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या विविध विभागांशी संबंधित आहेत. त्यामुळे या सर्व विभागांशी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांची मंगळवारी (७ जून) मुंबईत बैठक घेण्यात येणार आहे, असे आश्वासान भुसे यांनी दिले. या बैठकीचे निमंत्रण स्वीकारून शेतकऱ्यांनी सध्या सुरू असलेले आंदोलन तूर्त स्थगित केलं असून मंगळवारच्या बैठकीनंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी सांगितलं आहे.

पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी १ जूनपासून धरणे आंदोलन सुरू केले होते. ५ जूनपर्यंत दररोज धरणे धरण्यात येणार होते. आज चौथ्या दिवशी कृषिमंत्री भुसे यांनी पुणतांब्यात येऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. प्रदीर्घ काळ चाललेल्या चर्चेत प्रत्येक मागणीवर विचार करण्यात आला. या मागण्या सरकारमधील विविध विभागांशी संबंधित आहेत. त्यामुळे या विषयावर मुंबईत संयुक्त बैठक घेण्याचं ठरवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संबंधित विभागांचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकऱ्यांसोबत मंगळवारी ७ जूनला ही बैठक होणार आहे. यासाठी पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या नेत्यांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे. हा तोडगा आंदोलक शेतकऱ्यांनीही मान्य केला. मंगळवारची बैठक होईपर्यंत सध्या सुरू असलेले आंदोलनही तूर्त स्थगिती करण्यात आलं आहे. मंगळवारी होणाऱ्या बैठकीनंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

स्विफ्ट आणि ट्रकची धडक : भीषण अपघातात ४ ठार; गरोदर महिला गंभीर जखमी

कृषिमंत्री काय म्हणाले?

मंत्री भुसे यांनी सांगितलं की, ‘या मागण्यांसंबंधी राज्य सरकार सकारात्मक आहे. यासंबंधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल. त्यावर चर्चा करून जे प्रश्न तातडीने मार्गी लावता येतील, ते लावले जातील. इतर प्रश्नांसाठी संबंधित यंत्रणा आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल.’

दरम्यान, या बैठकीला शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, रावसाहेब खेवरे हेही उपस्थित होते. सरपंच डॉ. धनंजय धनवटे, धनंजय जाधव, सुहास वहाडणे, रावसाहेब खेवरे यांच्यासह आंदोलक शेतकऱ्यांनी चर्चेत भाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here