रामगढच्या चित्तरपूर ब्लॉकमध्ये असलेल्या रजरप्पा वसाहतीत वास्तव्यास असलेली दिव्या पांडेय यूपीएससी परिक्षेत देशात ३२३ वी आल्याचा दावा करण्यात आला होता. तू ३२३ आली आहेस, अशी माहिती दिव्यासोबत यूपीएससी दिलेल्या मित्रमंडळींनी दिव्याला कॉलवर दिली. ही बातमी पसरताच दिव्याला अभिनंदनाचे फोन येऊ लागले. दिव्याच्या घरी परिचितांची रांग लागली. सगळ्यांनीच दिव्याचं कौतुक केलं. सेंट्रल कोलफिल्ड्सचे सीएमडी, रजरप्पाचे जीएम, रामगढच्या जिल्ह्याच्या आयुक्ता माधवी मिश्रा यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी दिव्या पांडेयचं अभिनंदन केलं.
यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दावा करणाऱ्या दिव्याच्या वडिलांचा सीसीएलच्या अधिकाऱ्यांनी सत्कार केला. दिव्याचे वडील सीसीएलमध्ये क्रेन ऑपरेटर आहेत. अनेक वृत्तवाहिन्यांनी, वृत्तपत्रांनी दिव्याच्या यशाच्या बातम्या दिल्या. मात्र सत्य वेगळंच निघालं.
यूपीएससी परिक्षेत ३२३ वा क्रमांक दिव्या पांडेयचा नव्हे, तर तमिळनाडूच्या दिव्या पीचा आला होता. नाव सारखं असल्यानं गैरसमज झाला आणि त्यातूनच पुढचा प्रकार घडला. दिव्या पांडेयच्या नातेवाईकांनी यूपीएससीच्या संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी इंटरनेट नीट सुरू नव्हतं. त्यामुळे त्यांनी दिव्याच्या मित्रमंडळींनी दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवला आणि सेलिब्रेशन सुरू केलं.
सत्य समजल्यावर दिव्यासह सगळ्यांनाच धक्का बसला. आमच्याकडून मोठी चूक झाली. त्यामुळे आता आम्हाला नामुष्की सहन करावी लागत असल्याचं दिव्याच्या आई वडिलांनी सांगितलं. दिव्याच्या कुटुंबानं जिल्हा प्रशासन आणि सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड यांची माफी मागितली आहे.
वडिलांच्या निधनानंतरही खचून न जाता तन्मयीनं मिळवलं यूपीएससी परीक्षेत यश