ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक नेते अशी ओळख असलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री यांनी आज फेसबुकवर टाकलेल्या पोस्टची सर्वत्र चर्चा आहे. ‘करोनाच्या संकटकाळात एक राजकीय कार्यकर्ता म्हणून शक्य ते केले. पण होम क्वारंटाइन झाल्यापासून आपली माणसंही मला फोन करत नाहीएत. साथीला कोणीच नाहीए. एखादा गुन्हा केल्याप्रमाणे माध्यमे माझ्याकडं बोट दाखवत आहेत. माझं मन हरल्यासारखं झालंय. माफ करा,’ अशी अगतिकता आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

करोनाबाधित पोलिसाच्या संपर्कात आल्यानं जितेंद्र आव्हाड गेल्या काही दिवसांपासून ‘होम क्वारंटाइन’ आहेत. मात्र, त्यांच्यानंतर त्यांच्या संपर्कातील अनेकांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आव्हाड यांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षक, घरातील कर्मचारी व जवळच्या काही सहकाऱ्यांनाही कोविड पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्याच अनुषंगानं आव्हाड यांनी भलीमोठी पोस्ट लिहिली आहे.

वाचा:

करोनाच्या संकटकाळात एक राजकीय कार्यकर्ता म्हणून व माणुसकीच्या नात्यानं मतदारसंघात केलेल्या कामाचा सविस्तर उल्लेख त्यांनी पोस्टमध्ये केला आहे. तसंच, सहकाऱ्यांच्या कामाचं कौतुकही केलं आहे. कुठलाही स्वार्थ न ठेवता सामाजिक जबाबदारी म्हणून गेले अनेक दिवस सहकाऱ्यांसह मी खपतो आहे. मात्र, होम क्वारंटाइन झाल्यापासून माझा ‘अभिमन्यू’ झाल्यासारखं वाटत आहे. कशासाठी हे सगळं केलं, असं द्वंद्व मनात सुरू आहे, असं त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

वाचा:

अनंत करमुसेच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. या प्रकरणातही सगळ्यांनी मलाच लक्ष्य केलं. ‘करमुसेनं माझं अर्धनग्न चित्र सोशल मीडियावर टाकलं. ते चुकीच आहे असं म्हणायची हिंमत कुणीच दाखवली नाही. माझ्या पत्नीवर आणि मुलीवर बलात्कार करण्याच्या धमक्या देणाऱ्यांबद्दल कुणी अवाक्षरही काढलं नाही. त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. आजही करमुसे त्याचं फेसबुक अकाउंट पोलिसांना उघडू देत नाहीए. तरीही सगळी माध्यमं माझ्याकडंच बोट दाखवताहेत. सगळ्यांना मी एवढा का खुपतो,’ असा उद्विग्न प्रश्नही त्यांनी केला आहे.

‘गेल्या काही दिवसांपासून मला व्हिलन म्हणून दाखवण्याचं काम सुरू आहे. माझ्या जवळच्या लोकांना करोनाची लागण होण्यास मीच जबाबदार आहे, असं चित्र निर्माण केलं गेलंय. समाजामध्ये गरिबांसाठी लढणारे हे नेहमी लोकांच्या आकसामुळे बळी जातात किंबहुना ते हरतात. त्यांचा शक्तिपात करण्यासाठी व्यवस्थित डाव आखला जातो आणि अखेरीस ते त्याला बळी पडतात. माझ्या बाबतीतही तसंच झालंय,’ अशी भावनाही त्यांनी व्यक्त केलीय.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here