साताऱ्याच्या पावसासह बृजभूषण सिंह यांनाही मॅनेज केलं? शरद पवारांनी दिलं गंमतीशीर उत्तर – ncp president sharad pawar’s reply to the allegation of managing bjp mp brijbhushan sharan singh
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आपल्या अनोख्या राजकीय डावपेचांसाठी ओळखले जातात. त्यामुळे पवार यांच्या राजकीय विरोधकांमध्ये कायमच संभ्रमाचं वातावरण असतं. परिणामी कोणतीही घटना घडली की त्यात शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोप अनेकदा केला जातो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अयोध्या दौरा रद्द करण्याची नामुष्की ओढावण्यामागेही पवारांचीच रणनीती असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवार यांनी आपल्यावर होत असलेल्या आरोपांबाबत सडेतोड उत्तर दिलं आहे.
तुम्ही साताऱ्याता पावसाला पण मॅनेज केलं होतं का? असा मिश्किल प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर पवार म्हणाले, एक काळ असा होता की लातूरमध्ये भूकंपही शरद पवारांमुळे झाला असे म्हणणारे लोक होते. आता बृजभूषण सिंह यांना मॅनेज करण्याचे काम मी केले असं म्हटलं जात आहे. पण त्यात तथ्य नाही. ३० वर्ष मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. राष्ट्रीय पातळीवर बृजभूषण हे काम पाहतात. ते दिल्लीत काम करतात. बृजभूषण ही मॅनेज होणारी व्यक्ती नाही, असंही पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ‘केंद्रात जाऊन नितीन गडकरींना साध्य झालं ते शरद पवारांना का जमलं नाही?’
राज ठाकरे यांना दिला सल्ला
बृजभूषण शरण सिंह यांना महाराष्ट्रातून रसद पुरवली गेल्याचा आरोप राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द करताना केला होता. राज यांच्या या वक्तव्याचा रोख शरद पवारांकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. यावरून आता पवार यांनी राज ठाकरेंना एक सल्ला दिला आहे. ‘बृजभूषण सिंह यांची वैयक्तिक काही मते आहेत. त्यांना कोणी मॅनेज केले हे संबंधितांनी डोक्यातून काढून टाकावं,’ असा सल्ला पवारांनी नाव न घेता राज ठाकरे यांना दिला आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या या स्पष्टीकरणानंतर मनसेच्या गोटातून काय प्रतिक्रिया देण्यात येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.