पुणे: साखर कारखाने आणि इथेनॉल निर्मितीविषयी नितीन गडकरी यांनी केलेले मार्गदर्शन ऐकून मलाही आता साखर कारखाना काढावा, असे वाटू लागले आहे. पण त्याचवेळी मला नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे एक जुने वाक्य आठवते. एखाद्याला आयुष्यातून उठवायचे असेल तर त्याला साखर कारखाना काढून द्या, असे गडकरी यांनी म्हटले होते. त्यामुळे मी साखर कारखाना काढण्याचा मोह टाळेन, अशी मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शनिवारी साखर परिषद पार पडली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली होती.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, या कार्यक्रमात शरद पवार आणि नितीन गडकरी यांची भाषणं झाल्यानंतर माझं काम केवळ आभारप्रदर्शनापुरतं उरलं आहे. आम्ही शहरी बाबू आहोत. शहरी माणसांचा साखरेशी संबंध हा चहात टाकण्यापुरताच मर्यादित असतो. पण नितीन गडकरी यांनी आता साखर उद्योगाचं आणि इथेनॉल निर्मितीचं जे भवितव्य सांगितलं ते पाहून उद्या शहरातील लोक चहाबरोबर गाडीत किती साखर टाकू, हेदेखील विचारतील, अशी शाब्दिक कोटी उद्धव ठाकरे यांनी केली.
‘केंद्रात जाऊन नितीन गडकरींना साध्य झालं ते शरद पवारांना का जमलं नाही?’
मला साखर उद्योगातील विशेष काही कळत नाही. जेव्हा साखरेचा विषय येतो तेव्हा मी डावी-उजवीकडे पाहतो. कारण या क्षेत्रातील रथी-महारथी माझ्या आजुबाजूला बसलेले असतात. त्यामध्ये बाळासाहेब थोरात, अजित पवार, राजेश टोपे यांचा समावेश आहे. हे सगळे साखर उद्योगाला अडचणींमधून मार्ग काढत पुढे नेत आहेत. साखर उद्योगाच्या अडचणी दूर करण्यासाठी आपण निश्चित धोरण आणि रणनीती आखली पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

भविष्यात इथेनॉल आणि बायोडिझेल साखर कारखान्यांसाठी उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत ठरेल: गडकरी

पुण्यातील वसंतदादा शुगर इन्सिट्यूटमध्ये शनिवारी साखर परिषद पार पडली होती. या कार्यक्रमाला नितीन गडकरी, शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनी भविष्यात ऊसापासून तयार होणारे इथेनॉल हे इंधनाला कशाप्रकारे पर्याय ठरू शकते, याबाबत सविस्तर विवेचन केले होते. आगामी काळात फ्लेक्स फ्युएल इंजिनांमुळे पेट्रोल-डिझेलऐवजी १०० टक्के इथेनॉल वापरुन वाहने चालवणे शक्य होईल. देशात सध्या पेट्रोल-डिझेलमध्ये २० टक्के इथेनॉल ब्लेंडिगचे धोरण आहे. हे प्रमाण आगामी काळात वाढल्यास इथेनॉल निर्मितीमधून साखर कारखानदारांना चांगले उत्पन्न मिळू शकेल. यामुळे कारखान्यात आलेल्या सर्वच ऊस साखरनिर्मितीसाठी वापरला जाणार नाही. त्यामुळे साखरेचे उत्पादनही आटोक्यात राहील आणि साखरेचे भाव हे स्थिर राहतील, असे गडकरी यांनी म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here