दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी लिखित-दिग्दर्शित ‘सम्राट पृथ्वीराज’ हा सिनेमा भव्यतेच्या आणि मनोरंजनाच्या धर्तीवर आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘जोधा अकबर’ सिनेमाची आठवण करुन देतो. दिग्दर्शक द्विवेदी यांनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आवश्यक असलेलं सर्व काही सिनेमात समाविष्ट करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. ही रंजनाची भट्टी अत्यंत अलंकारिक, भावनिक, उत्साही, अभिमानास्पद, शौर्यपूर्ण आणि सामाजिक संदेश देणारी जमली आहे. दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी यापूर्वी ‘चाणक्य’ आणि ‘मृत्युंजय’ या गाजलेल्या टीव्ही मालिकांचं लेखन-दिग्दर्शन केलं होतं. ऐतिहासिक कथाकथनाचा आणि नाट्याचा द्विवेदी यांच्या गाठीशी असलेला अनुभव ‘सम्राट पृथ्वीराज’ सिनेमाच्या लिखाणात आणि संवादांमध्ये प्रतिबिंबित होताना दिसतो.
सिनेमात सर्व आलबेल असलं तरी बॉलिवूड फिल्म तडका मारण्याचा मोह दिग्दर्शक आणि निर्मात्यांना आवरता आला नाहीय. सादरीकरणात अनेक ठिकाणी नायकाचा आणि तत्कालीन व्यक्तिमत्त्वाचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी सर्जनशील स्वातंत्र्य (क्रिएटिव्ह लिबर्टी) घेण्यात आलं आहे. तसंच सिनेमात कथानकाला पूरक असं पार्श्वसंगीत आणि काव्य-श्लोकांच्या माध्यमातून पार्श्वगीतही आहे. तरीही नायक-नायिकेच्या कल्पनाविलासातील गाणी सिनेमात पेरण्यात आली आहेत. ती खटकतात. परिणामी प्रसंगांचं गांभीर्य टिकून राहत नाही. सिनेमाच्या उत्तरार्धात नायिकेवर चित्रित झालेलं गीतही अतिशयोक्ती भासवणारं आहे. वैयक्तिक पातळीवर ही दोन्ही गाणी, कलाकारांचं नृत्यकौशल्य कलात्मकदृष्ट्या उजवं आहे. पण, अशा ऐतिहासिक सिनेमाच्या बाबतीत दिग्दर्शक, निर्मात्यांनी क्रिएटिव्ह लिबर्टीच्या मर्यादा स्वतःभोवती आखून घ्याव्यात; जेणेकरून सिनेमात खरंच इतिहासाचे प्रतिबिंब दिसेल.
अक्षयकुमारनं सम्राट पृथ्वीराजच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. तर माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरनं या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. पदार्पणात मानुषीनं केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. तिनं संयोगिता उत्तमरित्या साकारली आहे. काका कान्हाच्या भूमिकेत संजय दत्तनं स्वतःच्या अनुभवाला साजेसं संयमी काम केलं आहे. तर कवी चंदवरदाई , मोहम्मद घोरीच्या भूमिकेत मानव विज आणि कन्नौजचे राजा जयचंदच्या भूमिकेत आशुतोष राणा यांनी अफलातून काम केलं आहे.
सिनेमाचं कथानक ‘पृथ्वीराज रासो’ या महाकाव्यावर आधारित आहे. या काव्यात सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या संपूर्ण जीवनाचं वर्णन आढळतं. त्यांचं हेच शौर्य आणि जीवनसंघर्ष, संयोगिताबरोबरचे त्यांचे प्रेम आणि लग्न या सिनेमात सुंदररित्या चित्रित करण्यात आलं आहे. स्त्री-पुरुष समानतेवर मार्मिक भाष्यही सिनेमाच्या पटकथेत आणि संवादात करण्यात आलं आहेत. कवी चंदच्या संवादातील वेद, पुराण, महाभारत-रामायणसारख्या महाकाव्यातील प्रसंगांचे दाखले पटकथेला अधिक पूरक ठरतात. यातील संवाद सिनेमाची बलस्थानं आहेत. सिनेमा तांत्रिक पातळीवरदेखील अव्वल आहे. सम्राट आणि सिंहाच्या लढतीची दृश्यं सीजीए आणि विएफएक्स या तंत्रज्ञानानं उत्कृष्टपणे चित्रित करण्यात आली आहेत. युद्धाची दृश्यं सिनेमॅटोग्राफरनं ‘वाइड अँगल टू क्लोज अप’ असा मुक्तसंचार केला आहे. त्याला संकलकाची साथही पूरक लाभली आहे. सिनेमाचं संगीत आणि पार्श्वसंगीत उमदा आहे. विलोभनीय अशी ही शौर्य आणि प्रेमगाथा नक्कीच पाहण्याजोगी आहे. नजीकच्या सिनेमांमधील अक्षयकुमारचं हे अव्वल काम म्हणायला हरकत नाही.
सिनेमा : सम्राट पृथ्वीराज
निर्मिती : आदित्य चोप्रा
दिग्दर्शक, लेखक : डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी
कलाकार : , , , सोनू सूद
छायांकन : मनुष नंदन
संकलन : आरिफ शेख
दर्जा : तीन स्टार