सेलू येथील श्रीकिशन गोपूलाल कर्ता हे नेहमीप्रमाणे सिद्धनाथ बोरगाव येथील आपल्या शेतात दुचाकीवरून जात होते. सेलू ते रवळगाव दरम्यान रस्त्यावर चार जणांनी त्यांची दुचाकी अडवून ‘आम्ही पोलीस आहोत, गाडी बाजूला घे, तु गांजा घेऊन जात आहेस का? तुझी झडती घ्यायची आहे’, अशी बतावणी करून कर्ता यांच्या हातातील सोन्याची ६ ग्रॅम वजनाची (किंमत ३० हजार रुपये) अंगठी काढून घेतली. त्यानंतर चारही भामटे पाथरीच्या दिशेने पसार झाले.
पोलिसांसमोर आरोपींना शोधण्याचे मोठे आव्हान…
नेमका काय प्रकार घडला आहे? हे श्रीकिशन गोपूलाल कर्ता यांना समजण्याच्या आधीच चोरट्यांनी घटनास्थळावरून धूम ठोकल्यामुळे त्यांनी सेलू पोलीस स्टेशन गाठून याप्रकरणी अज्ञात चोरटे विरोधात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असल्याचं वृत्त आहे. दरम्यान, शेताकडे जात असताना भर दिवसाच श्रीकिशन गोपूलाल कर्ता यांना पोलीस असल्याची बतावणी करून चार जणांनी मिळून असा प्रकार केल्यामुळे सेलू शहरासह तालुक्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे नागरिक सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिसांसमोर आरोपींना शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.