पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील रूखी शिवारात असलेल्या सिद्धेश्वर धरणाच्या कालव्यामध्ये आज सायंकाळी एका तरुणाचा मृतदेह पाण्यासोबत वाहून येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, जमादार राजू ठाकुर, संदीप सुरोशे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
बेपत्ता व्यक्तींची माहिती घेण्यास पोलिसांची सुरूवात…
पोलिसांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या मदतीने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला. सदरील मृतदेह ३० ते ३२ वर्ष असलेल्या तरुणाचा असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सदर मृतदेहाच्या कपडयातील खिशामध्ये ओळख पटविण्यासाठी कुठल्याही प्रकारची वस्तू नसल्याने पोलिसांनी आता बेपत्ता तरुणाचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी हिंगोली जिल्ह्यात सोबतच परभणी जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.
कालव्यात दुसऱ्यांदा आढळला मृतदेह…
दरम्यान, सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे. सदर तरुण शनिवारी कालव्यात पडला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. काल सुद्धा बाळापुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या परिसरात ईसापुर धरणातील कालव्यात एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. सलग दोन दिवस कालव्यात मृतदेह आढळून आल्याने हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.