नाशिकमध्ये आज कांदा परिषद पार पडली. या परिषदेला गोपीचंद पडळकर यांची उपस्थिती होती. नेहमीप्रमाणे आपल्या भाषणात त्यांनी शरद पवार यांना टार्गेट केलं. अतिशय आक्रमक होत शरद पवार यांच्या राजकारणावर पडळकरांनी तोफ डागली. पण टीका करताना त्यांनी सगळ्या मर्यादांचं उल्लंघन केलं.
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, शरद पवारांना लाथ मारा, ते बेशुद्ध पडतील, नंतर त्यांना कांद्याचा वास द्या, म्हणजे शुद्धीवर आल्यावर ते कांद्याला भाव देतील. आज मुख्यमंत्रिपदावर असलेले उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या आदेशाचं पालन करणार का?”, असं वादग्रस्त वक्तव्य पडळकर यांनी केलं.
चौंडीतही शरद पवारांवर बोचरी टीका
नातवाला लॉन्च करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी शरद पवार यांनी चौंडीत येऊन राजकारण केलं. राजकारणासाठी प्रेरणास्थळाचा वापर कसा काय करता, आम्ही याला कडाडून विरोध करु. मल्हारराव होळकर मुघलांच्या छाताडावर नाचले होते. यशवंतराव होळकरांनी इंग्रजांना चिरडलं होतं. पवारांना सांगू इच्छितो पोलीस बळाचा वापर करुन तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही. महाराष्ट्रातली बहुजनांची पोरं आजोबा-नातवाच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाही, अशी बोचरी टीका गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार पवार आणि रोहित पवार यांच्यावर केली होती.