रायगड: तमाम महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा सोमवारी किल्ले रायगडावर संपन्न होणार आहे. दरवर्षी ६ जून रोजी Shivrajyabhishek Sohala मोठ्या थाटामाटात पार पडतो. यंदाही या सोहळ्याच्यानिमित्ताने किल्ले रायगडावर शिवप्रेमींची गर्दी दिसत आहे. छत्रपती घराण्याचे वंशज असलेले संभाजीराजे छत्रपती काहीवेळापूर्वीच किल्ले रायगडावर दाखल झाले आहेत. आता थोड्याचवेळात रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होईल. करोनामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा नीटपणे साजरा करता आला नव्हता. मात्र, यंदा करोनाचे निर्बंध नसल्याने लाखो शिवप्रेमी रायगडावर हजेरी लावण्याची शक्यता आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek Sohla 2022)

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला रायगडवर जल्लोष, ढोल ताशांचा गजर अन् फटाक्यांची आतीषबाजी पाहायला मिळाली होती. कालपासून रायगडावर या सोहळ्याची लगबग सुरु आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करून शिवप्रेमींसाठी रायगडावर करण्यात आलेल्या सुविधांची माहिती दिली होती. गडावर अन्नछत्र चालू असून, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह , याचबरोबर निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गडाच्या पायथ्याला वाहनतळ, मोफत शटल बससेवा, अन्नछत्र उभारण्यात आल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली.
शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर जाताय, शिवप्रेमींसाठी तीन महत्त्वाच्या सूचना
वाहनांच्या पार्किंगासाठी खास सुविधा

पोलिसांकडून शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या लोकांची तीन भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यापैकी पहिला मार्ग हा सातारा-कोल्हापूरकडून येणार आहे. सातारा, महाबळेश्वर, पोलादपूर, महाड, नातेखिंड मार्गे स्वत:ची वाहने घेऊन येणाऱ्या शिवप्रेमींसाठी कोंझर-१ आणि कोंझर २ इथे वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, वाळसुरे १ येथेही पार्किंग सुविधा उपलब्ध असेल. याठिकाणी वाहने पार्क करून शिवप्रेमींना एसटीच्या शटल सेवेने रायगडाच्या दिशेने जाता येईल. कोंझर ३ ते पाचाड अशी एसटीची शटल सेवा सुरु राहील. एसटीने पाचाडपर्यंत पोहोचल्यानंतर शिवप्रेमींना किल्ले रायगडापर्यंतचा प्रवास पायीच करावा लागेल. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली रोप वे सेवा राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी सुरु असेल.

तर दुसरा मार्ग हा मुंबईहून येणाऱ्या शिवप्रेमींसाठी आहे. मुंबई, माणगाव, दालघर फाटा, कवळीचा मार्ग आणि सोनजई मंदिर असा हा प्रवास असेल. मुंबईकडून येणाऱ्या शिवप्रेमींच्या वाहनांसाठी सोनजई मंदिराच्या परिसरात पार्किंगची सुविधा उपलब्ध असेल. तर पुणे, ताम्हणी घाट, निजामपूर आणि सोनजई मंदिर असा प्रवास करत येणाऱ्या शिवभक्तांसाठीही याच ठिकाणी पार्किंगची सोय असेल. कवळीचा मार्ग आणि सोनजई येथून एसटीची शटल सेवा सुरु असेल. एसटीने शिवभक्तांना पाचाडपर्यंत सोडले जाईल. पार्किंग केलेली सर्व वाहने सुरक्षित राहतील, याची हमी पोलिसांकडून देण्यात आली आहे.शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी नातेखिंड ते किल्ले रायगड आणि सोनजई मंदिर ते किल्ले रायगड हा मार्ग सामान्य वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहील, असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here