शिवसेना आमदार मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येईल. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एका आमदाराचेही मत फुटणे, ठाकरे सरकारला परवडण्यासारखे नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये एकत्रच ठेवले जाईल. जेणेकरून भाजपकडून कोणत्याही आमदाराला फूस लावणे शक्य होणार नाही.
तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अपक्ष आमदारांचे मन वळवण्यासाठी स्वत: मैदानात उतरले आहेत. उद्धव ठाकरे हे सोमवारी संध्याकाळी सहा वाजता अपक्ष आमदारांची भेट घेणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या संजय पवार यांना मत देण्यासाठी अपक्ष आमदारांना कशाप्रकारे राजी करणार, हे पाहावे लागेल.
शिवसेनेचे शिष्टमंडळ हितेंद्र ठाकूरांच्या भेटीला
राज्यसभेच्या जागेसाठी बहुजन विकास आघाडीच्या (बविआ) तीन आमदारांची निर्णायक मते मिळविण्यासाठी सध्या शिवसेना-भाजपमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. यासाठी शनिवारी भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतल्यानंतर रविवारी खासदार राजन विचारे आणि आमदार सुनील राऊत त्यांच्या भेटीला आले. या नेत्यांमध्ये तब्बल चार तास चर्चा रंगली होती.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी ‘बविआ’च्या पालघर जिल्ह्यातील तीन आमदारांची मते महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे ती मिळवण्यासाठी शिवसेना आणि भाजपतर्फे प्रयत्न सुरू आहेत. बैठक संपल्यानंतर मात्र निवडणुकीवर जास्त भाष्य न होता, कौटुंबिक चर्चाच झाल्याचे त्यांनी सांगितले, तर सर्व पक्षांमध्ये माझे मित्र असल्याने ते भेट घेण्यासाठी येत असल्याचे ठाकूर म्हणाले. मात्र, राज्यसभेसाठी ‘बविआ’चा कोणाला पाठिंबा असेल, हे गुपित कायम ठेवत याबाबत योग्यवेळी निर्णय जाहीर करू, असे हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.
राज्यसभा निवडणूकीत भाजपचाच उमेदवार; रवी राणांचा सरकारवर निशाणा