पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे येत्या १५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या तयारीसाठी संजय राऊत, एकनाथ शिंदे आणि वरुण सरदेसाई हे तिघेजण शिवसेना कार्यकर्त्यांसह सोमवारी अयोध्येत दाखल झाले. यावेळी संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांनी रामल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबद्दल माहिती दिली. मात्र, यावेळी पत्रकारांनी आदित्य यांच्या दौऱ्यापेक्षा बृजभूषण सिंह, महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक आणि उत्तर भारतीयांबाबत शिवसेनेची भूमिका या मुद्द्यांवरूनच संजय राऊत यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना विरोध केला होता. त्याविरोधातील उत्तर भारतीयांच्या मनातील आक्रोश बृजभूषण सिंह यांच्या आंदोलनाच्यानिमित्ताने समोर आला, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यावर पत्रकारांनी राऊत यांना विचारले की, उत्तर भारतीयांबाबत शिवसेनेची भूमिका काय आहे? तेव्हा संजय राऊत यांनी त्यांच्या पाठिशी बसलेल्या शिवसेना नेत्याकडे हात दाखवला. हे आमचे मीरा-भाईंदरमधील नगरसेवक उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधील आहेत. एवढेच काय आमचे मुंबईतील बहुतांश पदाधिकारी हे उत्तर भारतीय आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला.
‘पाच लाखांची गर्दी जमवण्याचा दावा, पण बृजभूषण सिंहांच्या कार्यक्रमाला फक्त २५०० लोक’
राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतरही बृजभूषण सिंह आपल्या भूमिकेवर ठाम होते. राज ठाकरे यांना विरोध करण्यासाठी आयोजित केलेले त्यांचे सर्व कार्यक्रम नियोजनानुसार पार पडले होते. यामध्ये रविवारी झालेल्या शरयू स्नानाचाही समावेश होता. या कार्यक्रमाला ५ लाख लोक जमतील, अशी भीमगर्जना बृजभूषण सिंह यांनी केली होती. मात्र, प्रत्यक्षात या कार्यक्रमाला २००० ते २५०० लोकांचीच गर्दी जमल्याची माहिती पुढे आली आहे.