या महिलेच्या होणाऱ्या नवजात बाळाला करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न सुरू असल्याचेही जिल्हा रुग्णालयातील स्त्री-रोगशास्त्र विभागप्रमुख डॉ. कमलाकर मुदखेडकर यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. दरम्यान, शहरात तीन करोनाबाधित वाढल्यामुळे एकूण बाधितांची संख्या २८ झाली आहे.
१७ वर्षीय मुलगा करोबाधित असल्याचे आढळून आल्यानंतर त्याच्या आई व वडिलांचा स्वॅब घेण्यात आला होता. त्यानंतर संबंधित मुलाची गरोदर आई ही करोनाबाधित असल्याचे, तर मुलाचे वडील हे बाधित नसल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे संबंधित महिलेचे गरोदरपणाचे दिवस पूर्ण झाले असून, वेदनांमुळे तिला स्वतंत्र ‘कोव्हिड हॉस्पिटल’ अर्थात चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. कमलाकर मुदखेडकर म्हणाले, तिच्यापासून होणाऱ्या तिच्या नवजात बाळाला करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सर्वोत्तम खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून सद्यस्थितीत तिच्या नैसर्गिक प्रसुतीसाठी प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे कदाचित प्रतीक्षा करावी लागेल; परंतु दिवसभरात तिची प्रसुती होईल, अशी अपेक्षाही डॉ. मुदखेडकर म्हणाले. या संदर्भात, करोनाबाधित गरोदर महिलेकडून तिच्या जन्मणाऱ्या बाळाला संसर्ग होण्याची शक्यता नाही, असे सांगताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्रीरोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा म्हणाले, एचआयव्हीबाधित गरोदर महिलेकडून तिच्यापासून जन्मणाऱ्या बाळाला एचआयव्ही बाधा होऊ शकते, परंतु करोनाबाधित मातेकडून जन्मणाऱ्या शिशुला करोनाची बाधा होण्याची शक्यता नसते. स्तनपानातूनही करोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नसते. मात्र, संसर्ग होऊ नये, यासाठी जास्त खबरदारी घेणे आवश्यकता असते. त्यासाठी प्रसुतीनंतर शिशुला बाजुला ठेवणे व केवळ स्तनपानासाठीच शिशुला मातेजवळ आणणे आणि जवळ आल्यानंतरही मातेला एन ९५ मास्क लावून पुरेशी स्वच्छता पाळणे खूप आवश्यक आहे, असेही डॉ. गडप्पा म्हणाले.
पुन्हा शहरात वाढले तीन बाधित
गरोदर करोनाबाधित महिलेसह शहरातील २२ वर्षीय तरुण तसेच ६५ वर्षीय महिलादेखील करोनाबाधित असल्याचे आढळून आले. संबंधित ६५ वर्षीय महिलेची प्रकृती गंभीर असल्याचेही घाटी प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले. त्यामुळे आता शहर व जिल्ह्यातील बाधितांची संख्या २८ झाली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून, दोन महिला करोनामुक्त झाल्या आहेत, असेही जिल्हा शल्यचिकित्सक व नोडल ऑफिसर डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी `मटा`शी बोलताना सांगितले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times