मुंबई: बॉलिवूडमधले रिलेशनशीपची यादी द्यायची झाली तर ती इतकी लांब होईल की काही विचारूच नका. बॉलिवूडमध्ये लग्नं करून सुखानं संसार करणाऱ्या जोड्या आहेत तशी घटस्फोट घेतलेलीही जोडपी आहे. पण यांच्यामध्येही काही अशा जोड्या आहेत की त्यांचं प्रेम अधुरच राहिलं. अशा जोड्यांमध्ये आजही ज्यांचं नाव घेतलं जातं ते म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा यांचं. ४५ वर्षापासून या दोघांमध्ये अबोला असला तरी बॉलिवूडमधल्या लव्हस्टोरीजचा विषय या दोघांशिवाय पूर्णच होत नाही.
अनेक पुरस्कार सोहळयांमध्ये अमिताभ आणि रेखा एकमेकांसमोर आले तरी न पाहिल्यासारखे करत निघून जातात. पण खरच तसं आहे का या प्रश्नाचं उत्तर दोघांचेही चाहते शोधत असतात. अमिताभ आणि रेखा यांच्यात मैत्रीपलीकडचं नातं होतं आणि ते लग्न करणार होते असंही बोललं जातं. पण त्यांच्या आयुष्यात असं काही वळण आलं की अमिताभ आणि जया भादुरी यांचा संसार सुरू झाला.
दो अंजाने या सिनेमाच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली. अमिताभ आणि रेखा ७० च्या दशकातील पडदयावरची प्रेक्षकांची आवडती जोडी होतीच पण प्रत्यक्ष आयुष्यातही ही जोडी एकमेकांमध्ये गुंतल्याची चर्चा होती.अर्थात या दोघांनी त्यावर कधीच खुलेपणाने भाष्य केलं नाही. रेखाने मात्र काही मुलाखतींमध्ये अमिताभवर तिचा जीव जडल्याचं सांगितलं होतं. नुकताच या दोघांच्या बाबतीत एक खास किस्सा समोर आला आहे.
जया बच्चनला अमिताभ आणि रेखाच्या नात्याविषयी कुणकुण होतीच, त्यामुळे तिनेच एकदा रेखाला जेवायला बोलवून अमिताभपासून लांब राहण्याचा सल्ला दिल्याचा किस्साही जगजाहीर आहे. पण त्याच रेखामुळे अमिताभ बच्चन जेवणाच्या टेबलावर जया बच्चन यांच्यावर भडकले होते हे खूप कमीजणांना माहिती आहे. पती पत्नी और वो या सिनेमाचा खराखुरा सीन बच्चन यांच्या घरातच घडला होता.
जया बच्चन राजकारणात सक्रिय झाल्यानंतर नेहमी वादग्रस्त विधान करायच्या आणि त्यासाठी अमिताभ बच्चन माफी मागून प्रकरण शांत करायचे. थोडक्यात स्वभावाने संयमी आणि शांत असलेल्या बच्चन यांचा रागाचा पारा त्यावेळी मात्र चांगलाच चढला होता. करण थापर यांनी अमिताभ आणि जया यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी अमिताभ बच्चन यांना रेखासोबतच्या रिलेशनशीपवर प्रश्न विचारले होते, अर्थात त्याची उत्तरं बिग बी यांनी दिली नाहीत. तर जया यांनाही यावरूनच प्रश्न विचारून भंडावून सोडलं होतं.
त्यानंतर करण थापर यांना बिग बी यांनी घरी जेवायला बोलवलं. तेव्हा जया बच्चन अमिताभ यांना भात वाढत असताना ते अचानक भडकले. मला भात आवडत नसताना तू का वाढत आहेस असं म्हणत त्यांनी घर डोक्यावर घेतलं. रोटी बनवून झाल्या नसल्यानं भात वाढला या जया यांनी दिलेल्या उत्तरालाही त्यांनी धुडकावून लावलं. हा प्रकार करण थापर यांच्या समोरच झाला. मुलाखतीत सतत रेखाविषयी विचारल्यानं बिग बी यांचा राग डोक्यात गेला असा तर्क त्यावेळी अनेकांनी लावला होता.