मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला अगदी चार दिवस उरल्याने वेगवान घडामोडी घडतायेत. प्रत्येक पक्ष एक-एक मत मिळविण्यासाठी हरएक अपक्ष आमदाराला जातीने फोन करुन पाठिंब्यासाठी विनवणी करतो आहे. अशातच कोरोना झाल्याने होम क्वारन्टाईन असलेले राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अपक्ष आमदारांना फोन केल्याचं समजतंय. राज्यसभेत भाजप उमेदवाराला पाठिंबा द्या, असं आवाहन ते अपक्ष आमदारांना फोनवरुन करत आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारला पाठिंबा दिलेल्या आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. तत्पूर्वीच फडणवीसांनी आमदारांना फोन करुन पाठिंब्यासाठी गळ घातली आहे.

भाजपकडून तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले जातायत. त्याचाच भाग म्हणून होम आयसोलेट असलेले देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये आहेत. प्रत्येक अपक्ष आमदाराला ते स्वत: जातीने फोन करत आहेत. भाजपच्या संख्याबळानुसार दोन उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. पण तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला प्रयत्नांची पराकष्ठा करावी लागत आहे. अशात अपक्ष आमदारांचा भाव चांगलाच वधारला आहे. महाविकास आघाडी आणि भाजपही अपक्ष आमदारांना फोन करुन तसेच भेटून पाठिंब्यासाठी गळ घालत आहेत.

फडणवीसांचे अपक्ष आमदारांना फोन

होम आयसोलेट असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी अनेक अपक्ष आमदारांना स्वत: फोन केले. आपण भाजपच्या उमेदवाराला मत देऊन पाठिंबा दर्शवावा, असं आवाहन त्यांनी अपक्ष आमदारांना केलं. त्यातील काही आमदारांनी संमिश्र प्रतिसाद दिल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहेत. एकंदरित भाजपच्या कालच्या बैठकीनंतर कोणते अपक्ष आमदार भाजपला पाठिंबा देऊ शकतात, याची लिस्ट तयार असल्याने फडणवीस संबंधितांना थेट कॉन्टॅक्ट करत आहेत.

आधी निवडणुकीचं काम, नंतर कोरोनावर औषधोपचार, फडणवीस इन अ‍ॅक्शन मोड!
भाजपची महत्त्वपूर्ण बैठक

रविवारी भाजपच्या नियोजित बैठकीसाठी केंद्रीय रेल्वेमंत्री आणि राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपचे महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून काम पाहणारे अश्विनी वैष्णव हे मुंबईत आले होते. राज्यसभेच्या दृष्टीने पूर्वनियोजित असलेली बैठक भाजपच्या प्रदेश कार्यालयात पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली. निवडणूक प्रभारी अश्विनी वैष्णव, देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तसेच भाजप नेते तथा आमदार आशिष शेलार या पाच जणांमध्ये ही विशेष बैठक पार पडली.

“सेनेच्या पवारांना आस्मान दाखवण्याची रणनीती ठरली, व्यवस्था झाली, फडणवीसांनी प्लॅन सांगितला”
सेनेच्या पवारांना आस्मान दाखवण्याचा प्लॅन ठरला- शेलार

“शिवसेनेच्या संजय पवार यांना आस्मान दाखविण्याची सगळी तयारी झाली आहे. आजच्या बैठकीत त्याबद्दलची सगळी रणनीती ठरली आहे. राज्यसभा निवडणूक आणि मतदानादरम्यान कोण-कोणत्या गोष्टी करायच्या आहेत हे देवेंद्र फडणवीस सांगितलं आहे. नियोजनानुसार आमचा तिसरा उमेदवार धनंजय महाडिक जिंकून येणारच, आम्ही संजय पवार यांना आस्मान दाखवू”, असा आत्मविश्वास भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला. राज्यसभेच्या दृष्टीने भाजपच्या महत्त्वापूर्ण बैठकीनंतर शेलारांनी माध्यमांशी संवाद साधला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here