सुधाकर नारायण चिकटे (वय ४३ वर्ष, रा. हमू सांगळे कॉलनी, हनुमान मंदिर जवळ, हिमायत बाग परिसर, मूळ सिंदखेडा मतला ता. चिखली, जि. बुलडाणा) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आशा चिकटे (पत्नी – वय ४० वर्षे ), राजेश संतोष मोळवळे (मेव्हणा – वय ४७ वर्ष), अलका राजेश मोळवळे (मेव्हण्याची पत्नी), युवराज मोळवळे (मेव्हण्याचा मुलगा – वय १९ वर्षे) (तिन्ही रा. गोधरी, ता. चिखली, जि. बुलडाणा) अशी चौघा आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मृत सुधाकर हा ट्रॅव्हल चालक होता. मात्र गेल्या सात महिन्यापासून काम नसल्याने तो बेरोजगार होता. त्याचे हिमायत बाग येथील सांगळे कॉलोनी येथे दुमजली घर आहे. तर खाली किराणा आणि पिठाची गिरणी आहे. दोन्ही दुकाने सुधाकरची पत्नी आशा चालवते. गेल्या सात महिन्यापासून मेव्हण्याचा परिवार सुधाकरच्या वरच्या मजल्यावर राहत होता. सुधाकरच्या मोठ्या मुलीचं लग्न १५ दिवसांपूर्वीच पार पडले.
सुधाकरला दारुचे प्रचंड व्यसन होते. गेल्या सात महिन्यापासून तो सकाळपासूनच दारू प्यायचा व पत्नीला या ना त्या कारणाने मारहाण करायचा, असा दावा केला जातो.
अशी झाली हत्या
शनिवारी (दि. ४ जून) संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास सुधाकर दारुच्या नशेत घरी आला. दारू पिण्यासाठी रिक्षाने जायचे असल्याने त्याने पत्नीकडे पैशांचा तगादा सुरू केला. १५ दिवसांपूर्वी लग्न झालेली मुलगी घरी येणार असल्याने पत्नीने देखील वाद न घालता पैसे दिले. मात्र तरीही सुधाकर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
दरम्यान पत्नी आशाचा भाऊ राजेश कामावरून आला. व त्याने भाऊजींना समजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघेही बाहेर गेले. दोघांनी सोबत दारू प्राशन केले व परत घरी आले. घरी आल्यावर पुन्हा सुधाकरने शिवीगाळ करीत पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. नेहमीच्या त्रासाला कंटाळून पत्नी आशाने तिचा भाऊ राजेशसोबत पती सुधाकरच्या हत्येचा कट रचला आणि हत्येसाठी लागणारा लोखंडी रॉड आणण्यासाठी भावाला पैसे दिले.
राजेशने दुकानातून रॉड आणला. रात्री जेवणानंतर सुधाकर सोफ्यावर बसला होता. दरम्यान राजेशने पाठीमागून सुधाकरच्या डोक्यात दोन वेळा हल्ला केला. या हल्ल्यात सुधाकर जागीच गतप्राण झाला. आवाज झाल्याने राजेशची पत्नी अलका व मुलगा युवराज दोघेही खाली आले. त्यांनी खाली घडलेला प्रकार पहिला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अल्काने किराणा दुकानातून गोणी आणली. त्यात मृतदेह बांधून युवराज आणि राजेश दोघांनी मोपेडवरून तो मृतदेह हिमायतबाग परिसरातील निर्जनस्थळी नेला. तिथे मोपेडमधील पेट्रोल नळीच्या साहाय्याने काढून सुधाकरचा मृतदेह जाळला आणि दोघेही घरी परत आले. दरम्यान अलका आणि आशा या दोघींनी घरातील रक्ताची साफसफाई केली.
असा झाला उलगडा
अर्धवट जळालेल्या अवस्थेत पोलिसांना हिमायतबाग परिसरात मृतदेह आढळला होता. मात्र कुठलेही धागदोरे पोलिसांच्या हाती नव्हते. आज सकाळी पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी गुन्हे शाखेच्या पथकांची बैठक बोलावत. नकाशाद्वारे परिसराची माहिती घेतली. हत्या झालेल्या परिसराजवळील वसाहतीमध्ये पथके रवाना केली. सांगळे कॉलनी भागात पथक गेल्यावर पांढऱ्या रंगांची मोपेड पोलिसांना आढळून आली. तशीच हुबेहूब दिसणारी मोपेड एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. पोलिसांनी त्या मोपेडवरून शेजाऱ्याकडून मोपेड उभी असलेल्या घरातील लोकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले असता पोलिसांना सुधाकर बेपत्ता असल्याचे कळाले.
पोलिसांनी घरातील सदस्यांना विचारपूस केली असता, सुरुवातीला सर्वांनीच उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र सुधाकरच्या १५ वर्षीय मुलाला विश्वासात घेताच त्याने मामाने हत्या झाल्याची कबुली दिली. पोलिसांनी राजेशला ताब्यात घेत विचारपूस केली असता बहिणीला नेहमी त्रास देत आल्याने हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत