केतकीच्या या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्यासाठी हायकोर्टाला मंगळवारी अर्जाद्वारे विनंती करणार असल्याची माहिती अॅड. घनश्याम उपाध्याय यांनी ‘मटा’ला दिली. १४ मे रोजी कळवा पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर १५ मे रोजी केतकीला अटक झाली. ठाणे न्यायदंडाधिकारी कोर्टाने केतकीला १८मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे.
“ज्या व्यक्तींनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या नावाचा कवितेत उल्लेख नाही. कथित आक्षेपार्ह कविता ही पवार नावाच्या व्यक्तीला उद्देशून आणि त्या व्यक्तीला दुखावणारी असल्याचे गृहित धरले तरी कोणत्याही पवार नावाच्या व्यक्तीने पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केलेली नाही. मग पोलिस मला अटक कशी करू शकतात? शिवाय एफआयआर दाखल झाला तरी सर्वोच्च न्यायालयाने अर्नेश कुमार निवाड्यात दिलेल्या आदेशाप्रमाणे मला फौजदारी दंड संहितेच्या कलम ४१-अ अन्वये आगाऊ नोटीसच देण्यात आली नव्हती. अदलखपात्र कलमे लावण्यात आलेली असतानाही पोलिसांनी मला अटक केली. त्यामुळे माझ्याविरोधातील एफआयआर व अटक कारवाईही बेकायदा आहे”, असं केतकीने कोर्टात म्हटलं.
“शिवाय मी पोस्ट केलेल्या एकाच कवितेबद्दल राज्यभरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत एफआयआर दाखल करायला लावून आणि पोलिस यंत्रणेला हाताशी धरून माझ्याविरोधात सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली आहे. माझ्यावर एकामागोमाग अनेक पोलिस ठाण्यांतील पोलिसांकडून अटक कारवाई होऊन कायद्याचा व सत्तेचा गैरवापर होण्याचीही भीती आहे”, असे म्हणणे केतकीने आपल्या याचिकेत मांडले आहे. दरम्यान, जामीन मिळण्यासाठी केतकीने सेशन्स कोर्टात अर्जही केला असून त्यावर बुधवारी (८ जून) सुनावणी होण्याची शक्यता आहे.