आपल्याला ईश्वरभक्त म्हणविणारे सूफी संत मन्सूर अल्-हलाज यांना ईशनिंदा (ब्लाश्फेमी) केल्याबद्दल सन ९२२ मध्ये बगदादमध्ये मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली होती, अशा नोंदी आहेत. त्यांच्या आधी आणि नंतर आजपर्यंत जगातील विविध धर्मांच्या अनुयायांनी ईशनिंदेचा ठपका ठेवून हजारो प्राण घेतले असतील. तशा धमक्या आजही दिल्या जातात. कोणत्याही धर्मसमुदायाच्या भावना दुखावणे किंवा कोणालाही ईशनिंदा वाटेल, अशा स्वरूपाचे वक्तव्य करणे, हे किती प्रकारचे गंभीर परिणाम करू शकते, हे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि दिल्ली प्रदेश शाखेचे प्रवक्ते नवीन जिंदाल यांच्या निलंबनातून दिसू शकते. या निलंबनाने एव्हाना आंतरराष्ट्रीय बनलेला हा पेच सुटतो, की केंद्र सरकारला आणखी काही पावले टाकावी लागतात, हे येत्या काही दिवसांतच कळेल. नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल या दोघांनीही ‘आपल्याला सतत धमक्या येत असून आपले प्राण धोक्यात आहेत,’ असे म्हटले आहे. तेव्हा त्याही दृष्टीने कायद्याचे राज्य राखण्यासाठी आवश्यक ती पावले केंद्र आणि संबंधित राज्य सरकारांना टाकावी लागतील. दरम्यान, याच वादातून कानपूरमध्येही हिंसाचार उसळला. त्यातील दोषींवर सध्या कारवाई होते आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू नेमके याच वेळेस पश्चिम आशियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनाही या वादाची झळ लागली आहे. करोनाचे कारण देऊन त्यांच्यासोबतचा शाही खाना कतारच्या राजघराण्याने रद्द केला. देशात समाजमाध्यमांमध्ये उग्र, हिंस्र आणि बेछूट वक्तव्यांना जोर चढला असून, त्यांच्यावर नियंत्रण कसे आणणार, हेही आव्हान आहे. देशात धर्माधर्मांमधील तेढ तातडीने कमी करणे आणि त्याच वेळी, जागतिक पातळीवर सुरू झालेला भारतविरोधी प्रचार रोखणे, असे दुहेरी आव्हान आज केंद्र सरकारसमोर आहे. नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावरील कारवाईकडे अशा व्यापक दृष्टीने पाहावे लागेल. यात केवळ धर्मभावनाच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचेही अनेक पदर गुंतलेले आहेत. त्याच व्यापक दृष्टीने त्याकडे पाहायला हवे.

वाहिन्यांवरील अधिकाधिक स्फोटक होणाऱ्या चर्चा टीआरपी वाढवत असल्या, तरी त्या देशाचे किती मोठे नुकसान करू शकतात, हे या निमित्ताने दिसते आहे. वाराणसीत ज्ञानवापी मंदिरात जे काही काम चालू आहे, त्याचे निष्कर्ष न्यायालयासमोर जावेत. त्यातून पुढे काय तो निकाल न्यायसंस्थेने द्यावा; मात्र या प्रकरणात दोन्ही बाजूंनी वातावरण गरम करण्यातच अनेकांना रस आहे. नेमक्या याच विषयावरील चर्चेत नुपूर शर्मा यांनी काही विधाने केली. त्यांनी ती नंतर मागेही घेतली; पण तोवर व्हायचे ते नुकसान झाले होते. जगातल्या कोणत्याही धर्माच्या प्रेषित, अवतार, देवता किंवा महापुरुषांबद्दल बोलताना किमान संयम आणि विवेक पाळला पाहिजे, याचा विवेक सगळ्यांनीच सोडल्याला बराच काळ झाला आहे. आपल्याला का राग आला, याची काही कारणमीमांसा नुपूर शर्मा यांनी देण्याचा प्रयत्न केला; मात्र हा बचाव ठरू शकत नाही. आखातामधील कतार, सौदी अरेबिया आदी देशांनी निषेध नोंदविलाच आहे. पाकिस्ताननेही ही संधी साधली. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांनी एकदम चढा स्वर लावला. या विवादातून काळजीपूर्वक आणि राष्ट्रीय हिताचे नुकसान होऊ न देता बाहेर पडावे लागेल.

जगभरात एक कोटी ८० लाख भारतीय राहतात. त्यातील सर्वाधिक आखाती देशांमध्ये आहेत. गेल्या तीन वर्षांत अनिवासी भारतीयांनी १९ लाख कोटी रुपये मायदेशी पाठवले आहेत. ही रक्कम अनेक देशांतर्गत उत्पन्नांपेक्षा जास्त आहे. सध्याच्या रशिया आणि युक्रेन यांच्या संघर्षकाळात भारताच्या तेलाच्या गरजेवर पडणारा ताण तर उघडच आहे. सुदैवाने, भारताचे सौदी अरेबियासकट सर्व आखाती देशांशी उत्तम संबंध आहे. इराणवर येणाऱ्या जागतिक दबावातही भारताने इराणला साथ दिली आहे. या संबंधांमध्ये कुठेही धर्म आला नाही. भारतात धार्मिक ताणतणाव वाढला आणि द्विपक्षीय नात्यांमध्ये धर्म डोकावू लागला, तर अनेकांना ते हवेच आहे. पाकिस्तानने ज्या वेगाने या वादात उडी घेतली, त्यावरून हे लक्षात यावे. अशा वेळी, समाजहित आणि राष्ट्रहित डोळ्यांपुढे ठेवून संयमाने वागणे व बोलणे आवश्यक असते. नुपूर शर्मा यांना आपण केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्या आहोत, हा विवेक पाळता आला नाही. त्याची त्यांना शिक्षा होण्यापेक्षाही, देशाचे जागतिक मंचावर होणारे नुकसान किती तरी अधिक गंभीर आहे. या प्रकरणातून धडा घेऊन, सत्ताधारी पक्षातील वाचाळांनी स्वत:ला आवर घालावा. तसे न झाल्यास त्यात देशाचे नुकसान आहे. याच वेळी, जे हात तोडण्याची, मुंडकी उडविण्याची निरर्गल भाषा करीत आहेत, त्यांनाही कायद्याच्या राज्याचा हिसका दाखवायला केंद्र व राज्य सरकारांनी मागेपुढे पाहू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here