हिंगोली : विवाह सोहळ्यातील जेवणातून तब्बल ९३ जणांना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी घडली. यामध्ये सात लहान मुलांचाही समावेश आहे. या सर्वांना कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालय तसंच खासगी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं आहे. वैद्यकीय पथकाने तातडीने रुग्णांवर उपचार सुरू केले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचं सांगण्यात आलं आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कळमनुरी येथील मदिना नगर नुरी मोहल्ला भागातील नागरिक सोमवारी सकाळी यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर येथे विवाह सोहळ्यासाठी गेले होते. दुपारी १ वाजता विवाह सोहळा आटोपल्यानंतर हे सर्वजण भोजन करून कळमनुरी येथे परत आले होते. मात्र दुपारी ४ ते ४.३० वाजण्याच्या सुमारास विवाह सोहळ्यात भोजन केलेल्या नागरिकांना उलट्या, मळमळ, पोटदुखी, चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे साडेचार वाजता एक रुग्ण कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला. मात्र त्या रुग्णावर उपचार सुरू करण्यापूर्वीच इतर रुग्ण दाखल होण्यास सुरुवात झाली.

Rajya Sabha Election : जुनाच ‘फॉर्म्युला’ महाविकास आघाडीला तारणार? आज मुंबईत हुकमी शस्त्र वापरणार

दरम्यान, रुग्णांची संख्या वाढत असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद मेने यांनी तातडीने या प्रकाराची माहिती शासकिय रुग्णालयास दिली. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, डॉ. गोपाल कदम यांनी तातडीने पथक तयार करून कळमनुरी येथे पाठवले. त्यानंतर डॉ. मेने व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांवर उपचार सुरू केले. रात्री ९ वाजेपर्यंत उपजिल्हा रुग्णालयात ६१ रुग्ण दाखल झाले होते, तर अद्यापही रुग्ण येत असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. तसंच ३२ रुग्ण कळमनुरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here