या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून आपल्या आमदारांची विशेष काळजी घेतली जात आहे. सुरुवातीला शिवसेनेच्या आमदारांना मुंबईतील विधानभवनानजीकच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार होते. मात्र, तिथे भाजप आमदारांचाही मुक्काम असल्याची माहिती कळताच शिवसेनेने हे हॉटेल बदलले. शिवसेनेच्या सर्व आमदारांना मार्वे बीच येथील रिट्रीट हॉटेलवर ठेवण्यात आले आहे. रिट्रीट हॉटेलमध्ये सर्व आमदारांच्या सुरक्षेसाठी शिवसेनेची विविध पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या पक्षाचा एकही आमदार फुटू नये यासाठी त्यांच्यावर करडी नजर ठेवली जात आहे. शिवसेना कार्यकर्त्यांची फौज हॅाटेलच्या चारही बाजूला तैनात आहे. मतदानाच्या दिवशी अर्थात १० जून रोजी सकाळी सर्व आमदारांची स्वाक्षरी एका कागदावर घेतली जाईल. त्यानंतर पुन्हा बसने त्यांना मतदानाच्या ठिकाणी नेण्यात येईल.
या सगळ्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या बुधवारी औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेलाही मोजकेच नेते आणि फक्त मराठवाड्यातील सहा आमदार उपस्थित राहतील. सभा संपल्यानंतर या आमदारांना विशेष विमानाने मुंबईत आणण्यात येणार आहे.
कोणत्याही परिस्थितीत संजय पवारांना राज्यसभेवर पाठवायचं आहे: उद्धव ठाकरे
वर्षा बंगल्यावर सोमवारी शिवसेना आमदार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक झाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या होत्या. कट्टर शिवसैनिकासाठी ही लढाई आपल्याला लढायची आहे. कोल्हापूरचा रांगडा शिवसैनिक पहिल्यांदाच राज्यसभेच्या मैदानात उतरला आहे. कोणत्याही परिस्थितीत संजय पवारांना आपल्याला राज्यसभेवर पाठवायचं आहे. तुम्ही कुणाला घाबरु नका, कुणासमोर झुकू नका, ऑफर प्रलोभनांना बळी पडू नका. धमक्यांना भीक घालू नका. सेनेच्या दोन्ही उमेदवारांमागे ताकदीने उभे राहा,” असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीला उपस्थित सगळ्या आमदारांना केले होते.