वर्षा बंगल्यावरून निघताना एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी म्हटले होते की, आम्हाला राज्यसभा निवडणुकीचे कोणतेही टेन्शन नाही. संजय पवार हे जिंकतील, याची आम्हाला खात्री आहे. आम्ही केवळ रणनीतीची भाग म्हणून आमदारांना एकत्र हॉटेलमध्ये ठेवले आहे. जेणेकरून मतदानाच्या दिवशी नेमके काय करायचे, याची व्यवस्थित माहिती त्यांना मिळेल. अपक्ष आमदारही आमच्यासोबतच आहेत. ते शिवसेनेलाच मतदान करतील, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.
महाविकासआघाडी मुंबईत शक्तीप्रदर्शन करणार?
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांची ऐतिहासिक आघाडी निर्माण झाल्यानंतर आमदार फुटू नयेत, यासाठी विशेष रणनीती आखण्यात आली होती. मुंबईत महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक घेत जोरदार वातावरणनिर्मिती करण्यात आली होती. राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा तोच फॉर्म्युला वापरला जाण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांसह इतर अपक्ष आमदारांची मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील आणि काँग्रेस पक्ष निरीक्षक मल्लिकार्जुन खरगे हे आमदारांना मार्गदर्शन करतील.