मात्र, राज्यसभा निवडणुकीची लढाई अटीतटीची झाल्याने शिवसेनेकडून MIM ची मदत घेतली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे नेते आणि कृषीमंत्री दादा भुसे यांनी एमआयएमचे आमदार फारुख शाह यांची भेट घेतल्याची चर्चाही होती. मात्र, एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. राज्यसभा निवडणुकीत पाठिंबा देण्याबाबत महाविकास आघाडीने आमच्याशी संपर्क केलेला नाही. त्यांनी संपर्क केला तर बघू. महाविकास आघाडीला पाठिंबा हवा नसल्यास आम्ही आमचा निर्णय येत्या एक-दोन दिवसांत घेऊ. पण महाविकास आघाडीने मदत मागितल्यास आम्ही त्याचा विचार करु, असे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले.
तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना राज्यसभा निवडणुकीतील प्रत्येक मताचं महत्त्व माहिती आहे. महाविकास आघाडीला आमचा पाठिंबा हवा असल्यास त्यांनी तो खुलेपणाने मागावा. भाजपला पराभूत करण्यासाठी त्यांना मदत हवी असेल तर आम्ही त्याबाबत विचार करू, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले.
गिरीश महाजनांनी घेतली हितेंद्र ठाकूरांची भेट
गेल्या दोन दिवसांपासून महाविकास आघाडी आणि भाजपकडून लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. गिरीश महाजन यांनी सोमवारी रात्री हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. गिरीश महाजन कोणालाही फारशी कुणकुण लागून न देता हितेंद्र ठाकूर यांच्या विरारमधील घरी पोहोचले. जवळपास दोन तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीत गिरीश महाज यांनी हितेंद्र ठाकूर यांचे मन वळवले का, हे आता १० तारखेलाच स्पष्ट होऊ शकेल.