नाशिक : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. परिणामी पाणी भरण्यासाठी महिलांना जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. नाशिक जिल्ह्यातही अशीच काहीशी स्थिती असून विहिरींना अक्षरशः तळ गाठला आहे. पेठ तालुक्यातील बोरीची बारी याठिकाणी आज सकाळी भाग्यश्री भोये ही महिला पाणी भरण्यासाठी गेली असताना तोल जाऊन विहिरीत पडल्याची घटना घडली आहे.
पाणीटंचाईचे भीषण वास्तव आणि गावकऱ्यांचा इशारा
गावात दोन-तीन दिवसातून एकदा टँकर येतो. मात्र हे पाणी गावकऱ्यांना अपुरे पडते. त्यामुळे या महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची दखल घ्यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी याठिकाणी त्वरित लक्ष घालून पाण्याची समस्या सोडवावी अन्यथा ग्रामस्थांकडून मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.