जळगाव : धरणगाव येथील कमला नगर भागातील एका घरात २१ वर्षीय तरुणीला दोरीने बांधून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शुभांगी विश्वास सावंत (वय २१ रा. चमगाव ता. धरणगाव ह.मु. कमल नगर धरणगाव) हिने दिलेल्या तक्रारीनंतर सोमवारी धरणगाव पोलीस स्थानकात दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, ५ जून २०२२ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास शुभांगी ही घरी एकटी असताना अज्ञात दोन इसम तोंडाला कापड बांधून चोरीच्या उद्देशाने घरात घुसले. यावेळी चोरट्यांनी शुभांगीच्या डोक्यावर झाडूने मारले आणि एक फडक्याचा बोळा शुभांगीच्या तोंडात खुपसला. तसंच घरातील दोरीने शुभांगीचे दोन्ही हात बांधले. त्यानंतर बेडरूममध्ये जाऊन लाकडी कपाट उघडून शोधाशोध करून पहिले असता दोघांना काहीही आढळून आले नाही. घरात काहीच न मिळाल्याने चोरट्यांनी शुभांगीला धमकी देण्यास सुरुवात केली.

पाण्यानेच घेतला असता जीव! खोल विहिरीतून पाणी काढताना महिलेचा गेला तोल अन्…

पैसे कोठे ठेवले आहेत? सोन्याचे दागिने कुठे ठेवले आहे? लॉकरची चावी कुठे आहे? असे प्रश्न चोरांनी शुभांगीला विचारले. तेव्हाच रस्त्याने जाणाऱ्या वाहनाचा आवाज आला आणि शुभांगीच्या मोबाईलमधे सायरनसारखा आवाज आल्याने दोन्ही चोर घाबरून घरातून पळून गेले.

दरम्यान, या तक्रारीवरून धरणगाव पोलीस स्थानकात दोन अनोळखी इसमांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच पुढील तपास उमेश पाटील हे करत आहेत. पोलिसांनी या घटनेचा सर्व बाजूने तपास करायला सुरुवात केली असून सखोलपणे चौकशी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here