मुंबई: ट्रेन सुरू होणार असल्याबाबतचे वृत्त देऊन वांद्रे स्टेशनबाहेर मजुरांची गर्दी होण्यास कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले पत्रकार राहुल कुलकर्णी यांना मुंबईतील वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

परराज्यातील मजुरांना गावी जाता यावे म्हणून रेल्वे विशेष गाड्या सोडणार असल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी दिले होते. वांद्रे स्टेशनबाहेर झालेल्या मजुरांच्या गर्दीमागे जी कारणे आहेत त्यात हे वृत्तही एक कारण असल्याचे सांगत पोलिसांनी राहुल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना उस्मानाबाद येथून अटक केली होती. आज त्यांना वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर राहुल यांना जामीन देण्यात आला.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी राहुल कुलकर्णी यांच्या जामिनावर प्रतिक्रिया देताना राहुल यांना जामीन मिळाला याचा मला आनंद झाला असे नमूद केले आहे. दुसरीकडे उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाकडून राहुल यांच्या अटकेचा निषेध करण्यात आला आहे. तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. मुंबई क्राइम रिपोर्टर्स असोसिएशननेही या कारवाईचा निषेध नोंदवला आहे.

दहा जणांना अटक

वांद्रे येथील ठिय्या आंदोलनप्रकरणी उत्तर भारतीय संघाचा नेता विनय दुबे याला सर्वात आधी अटक करण्यात आली होती. ‘चलो घर की ओर’ अशी सोशल पोस्ट टाकत त्याने मजुरांना वांद्रे स्टेशनबाहेर जमण्यासाठी आवाहन केले होते. दुबेनंतर आणखी ९ जणांना बुधवारी रात्री पोलिसांनी या आंदोलन प्रकरणी अटक केली. या सर्वांवर बेकायदा जमाव जमवून दंगल घडवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here