मानवत शहरातील कापड व्यापारी बजरंग कुटे पत्नी सुशीला यांच्यासोबत मानवतकडे दुचाकीवरून येत होते. पाथरी ढालेगाव दरम्यान आष्टी फाटा मार्गावर त्यांची दुचाकी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आली असता समोरून आलेल्या वाहनामुळे मोबाईलवर बोलत असलेल्या बजरंग कुटे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी रस्त्याशेजारी असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली. याचवेळी बजरंग कुटे यांच्या गळ्यात रस्त्याशेजारी असलेला तार अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पत्नी गंभीर जखमी
या अपघातात पत्नी सुशीला या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. दुचाकी चालवत असताना फोनवर बोलणे मानवत येथील कपडा व्यापारी बजरंग कुटे यांच्या जीवावर बेतले आहे. सदरील घटनेमुळे मानवत शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.