जंगलांचे क्षेत्र दिवसेंदिवस घटते आहे. वन्यप्राण्यांच्या अधिवासाची काळजीही वारंवार कानी येते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात तीन नवी अभयारण्ये जाहीर करण्याच्या निर्णयाचे स्वागत व्हावे. निसर्गरक्षणाची कळकळ तळागाळात झिरपण्यासाठी हा विषय सोपा करून सांगायला हवा. प्रत्येक राज्यात ३३ टक्के वनक्षेत्र राखणे बंधनकारक आहे. राष्ट्रीय वनक्षेत्र नियमावलीत तसे नमूद आहे. महाराष्ट्रातील वनक्षेत्राचा टक्का वीसच्या आत आला आहे. राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्याने, राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे प्रस्ताव जाईल आणि अभयारण्यांवर तातडीने अंमल होईल. या कामापूर्वी स्थानिकांना विश्वासात घेऊन, त्यांच्या योग्य पुनर्वसनानंतरच पुढे पाऊल टाकण्याच्या सूचना आहेत. संरक्षित क्षेत्रातील नागरिकांची घडी नीट बसविणे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. देशात १९७३मध्ये सर्वप्रथम नऊ व्याघ्र प्रकल्प जाहीर झाले. त्यात मेळघाट होते. पन्नास वर्षे होत आली असतानाही, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील आदिवासी गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटलेला नाही. तीन-चार वर्षांपूर्वी तेथे वन विभाग आणि ग्रामस्थांमध्ये मोठा संघर्ष झाला. अन्य ठिकाणचे चित्र फार वेगळे नाही. अभयारण्यांच्या घोषणांमागे निसर्गाची काळजी असली, तरी ग्रामस्थांच्या नैसर्गिक जगण्याचे विस्मरण होऊ न देण्याची खबरदारीही घ्यायला हवी. व्याघ्र प्रकल्पांमुळे परिसरातील ग्रामस्थांवर जंगल प्रवेशापासून इतरही बंधने येतात. त्यातून अनेकांवर गुन्हे दाखल होतात. संयम सुटलेले काही ग्रामस्थ अडवणुकीवर येतात. जंगलांना आगी लावण्यापासून वन्यजीवांच्या शिकारींपर्यंत त्यांची मजल जाते. व्याघ्र प्रकल्पांऐवजी संवर्धन राखीव क्षेत्र जाहीर करणे, हा त्यावरील उपाय असतो.

नव्या निर्णयानुसार १२ संवर्धन राखीव क्षेत्रांचीही घोषणा झाली आहे. राज्यात आतापर्यंत १५ संवर्धन राखीव क्षेत्र अधिसूचित करण्यात आली असून, त्यातील आठ क्षेत्रांना मागील दोन वर्षांत मंजुरी मिळाली आहे. अशा संवर्धन राखीव क्षेत्राच्या जंगलात प्रवेश करण्याची ग्रामस्थांना परवानगी असते. वनविभागाबरोबरचा संघर्ष त्यातून कमी होतो. राष्ट्रीय उद्यानांमध्ये वन्यजीवांना अपायकारक ठरणाऱ्या कृतींवर बंदी असते. अभयारण्यांमध्ये मात्र पशुचराईसाठी परवानगी असते. ग्रामस्थांचे वनहक्क असतात. निर्माण झालेले तंटे हाताळण्यासाठी सहृदय यंत्रणा लागते. नियमांवर बोट ठेवून होणारी अडवणूक तिढा वाढविते. सोयी-सवलतींनी जंगलप्रदेशातील मानव-वन्यजीव संघर्ष टळतो, असे नाही. वन्यजीवांच्या भ्रमणमार्गांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने अभयारण्ये उपयुक्त असतात. नव्या घोषणेमुळे भ्रमणमार्गांचे रक्षण होईल, ही समाधानाची बाब आहे.

राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीतील निर्णयाचे अनेक फायदे आहेत. उदाहरणार्थ, गडचिरोली जिल्ह्यातील कोलामार्का हे रानम्हशींचे क्षेत्र आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांच्या सीमेवर या म्हशींचे वास्तव्य आहे. या प्रदेशातील जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रानम्हशींच्या संवर्धनसाठी त्याचा उपयोग होईल. पर्यटनाच्या जागतिक नकाशावर स्थान मिळविणाऱ्या लोणार सरोवराकडे आजवर अक्षम्य दुर्लक्ष झाले. या तलावाभोवतीच्या वनक्षेत्राच्या संवर्धनावर बरेच मंथनही झाले. नव्या संवर्धन क्षेत्रामुळे या जंगलाला बळ मिळेल. लोणार सरोवराचीही काळजी कमी होईल. राज्यात १० धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित झाले आहेत; त्यापैकी सहा विदर्भातील आहेत. जंगलातील मानवी हस्तक्षेपावर आणि शिकारींवर चाप आणावा लागेल. नवे राखीव क्षेत्र घोषित करताना त्यांच्या व्यवस्थापनाचा सखोल विचार व्हावा. अपुऱ्या वनकर्मचाऱ्यांचा प्रश्न नेहमी चर्चेला येतो. या भरतीकडे सरकारने लक्ष द्यावे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वन्यजीव प्रेम सर्वश्रुत आहे. पर्यावरणाचा प्रभार असलेले पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्यही वनप्रेमी आहेत. या दोघांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पृथ्वीचे दोन तृतीयांश क्षेत्रफळ पाण्याने व्यापले आहे. उर्वरित जमिनीपैकी एक तृतीयांश भागावर वन आच्छादन हवे. नित्याच्या जंगलकटाईने तापमान वाढले आहे. महाराष्ट्रात आठ हजार ७२० किलोमीटर घनदाट जंगल आहे. वाढत्या उद्योगक्षेत्राच्या नावाखाली होणाऱ्या वृक्षतोडीमुळे निसर्गाचे संतुलन लोप पावते आहे. पर्यावरणाच्या समतोलाची सजगता नव्या पिढीपर्यंत नेण्याचे आव्हान मोठे आहे. अभयारण्ये आणि संवर्धन राखीव क्षेत्रांमुळे तापमानाचा टक्का कमी होण्यास हातभार लागेल. नव्या घोषणेचा लाभ नागपूरपासून धुळे, नाशिक, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूरपर्यंत पोहचणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्गमधील हत्ती हैदोसाच्या वाढीव भरपाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्वच क्षेत्रांत हा कित्ता गिरवावा. प्राण्यांच्या जिव्हाळ्याचे स्वागत व्हावे. जंगलक्षेत्रातील माणसांची काळजीही धोरणात झळकली, तर सुवर्णमध्य साधल्याचे समाधान असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here