ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपचे नेते प्रचंड आक्रमक झाले होते. शेंडी,जानव्याला हद्दपार करणं, हेच शिवसेनेचं हिंदुत्त्व आहे का, असा सवाल भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विचारला आहे. हे पोस्टर आक्षेपार्ह असून याबाबत आम्ही पोलिसांत तक्रार करणार असल्याचं भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांनी म्हटले. तसेच ब्राह्मण महासंघानेही या जाहिरातीबाबत आक्षेप घेतल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी यावर फार बोलणे टाळले. चेतन कांबळे यांनी ही जाहिरात दिली आहे. मला त्याविषयी फार माहिती नाही. मी स्थानिक नेत्यांकडून याबाबतची माहिती मागितली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सुरु असलेल्या टीकेलाही राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. विरोधकांचं तोंड नव्हे तर गटार आहे. तुमच्यात मतभेद असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी काय बोलावे याचे भान राखले पाहिजे. भाजपवाले भिजलेले फटाके फोडत असतील तर आम्ही त्याकडे फार लक्ष देणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.
