मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांना पुन्हा संधी देण्यात आली असून राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे या नव्या तीन नावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारीच्या स्पर्धेत असलेल्या पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत यांच्यासह इतर नेत्यांचा पत्ता कट झाला आहे.

परळी मतदारसंघातून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना भाजपकडून विधानपरिषदेसाठी संधी देण्यात येणार का, याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू होती. मात्र यावेळीही पंकजा यांना डावलण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. पंकजा मुंडे या विधानपरिषदेत जाण्यासाठी उत्सुक होत्या. त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये तसे संकेतही दिले होते. मला विधानपरिषदेत जाण्याची संधी मिळाल्यास, मी त्या संधीचं सोनं करेन, असेही पंकजा यांनी म्हटले होते. रोहित पवारांना शह देण्याच्या हेतूने कर्जत-जामखेडमध्ये विधानसभेला पराभूत झालेल्या राम शिंदे यांना विधानपरिषदेवर घेण्यात आल्याचं बोललं जात आहे.

शिवसेनेकडून सचिन अहिर, आमशा पाडवी विधानपरिषदेत, मग सुभाष देसाईंच्या मंत्रिपदाचं काय होणार?

दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीस हेदेखील पंकजा यांच्या विधानपरिषदेतील उमेदवारीसाठी सकारात्मक असल्याची चर्चा होती. मात्र, आता राज्यसभेपाठोपाठ पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेत जाण्याची संधीही हुकली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

कधी होणार मतदान?

महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. या १० पैकी भाजपकडे चार जागांवर निवडून येण्यासाठी आवश्यक असणारी मते आहेत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी दोन आणि काँग्रेसकडे एका जागेवर निवडून येण्यासाठी लागणारी मते आहेत. त्यामुळे दहाव्या जागेवरील लढत चुरशीची होणार आहे.

गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यस्मरण कार्यक्रमात पंकजा मुंडे झाल्या वाढपी; भाविकांना वाढलं जेवण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here