शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्वत: आमशा पाडवी यांना फोन करून विधान परिषद निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची तयारी करून ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्यासाठी आपल्या हक्काच्या वरळी मतदारसंघावर पाणी सोडणारे सचिन अहिर यांचीही उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, यानिमित्ताने एक पेच उद्बवण्याची शक्यता आहे. शिवसेनेने सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना विधान परिषदेत पाठवल्यास सुभाष देसाई यांचे विधिमंडळ सभागृहाचे सदस्यत्व आपसूकच रद्द होईल. सुभाष देसाई हे सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्योगमंत्री आहेत. मंत्रीपदावरील व्यक्तीने कोणत्याही एका सभागृहाचा सदस्य असणे आवश्यक असते. सभागृहाचे सदस्यत्व रद्द झाल्यास किंवा मंत्रीपदावर नियुक्ती होताना आमदार नसल्यास संबंधित मंत्र्याला पुन्हा सभागृहात निवडून येण्यासाठी सहा महिन्यांची मुदत असते. मात्र, नजीकच्या काळात पुन्हा विधानपरिषद निवडणुकी होण्याची शक्यता नाही. तसेच विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीचा मुद्दा इतक्यात सुटेल, अशी चिन्हं दिसत नाहीत. त्यामुळे विधानपरिषदेतून निवृत्त झाल्यास सुभाष देसाई यांना पुन्हा आमदारकीची संधी मिळणे जवळपास दुरापास्त आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे असलेल्या उद्योग मंत्रीपदाचं काय होणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता
आमशा पाडवी यांना संधी दिल्यास शिवसेनेतील सामान्य कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश जाईल. तर सचिन अहिर यांच्यामुळे आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघातील विजय सुकर झाला होता. त्याची परतफेड आता शिवसेनेकडून केली जाईल, असे बोलले जाते. आमशा पाडवी आणि सचिन अहिर यांना विधानपरिषदेवर पाठवले गेल्यास सुभाष देसाई यांना आमदारकीसोबत मंत्रिपदावरही पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. त्यानुसार येत्या सहा महिन्यांमध्ये मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतात. सुभाष देसाई यांच्यानंतर उद्योग खात्याचा कारभार सांभाळण्यासाठी नवा मंत्री मिळेपर्यंत हा कारभार आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवला जाऊ शकतो, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात आहे.
शब्द पाळला, आदित्य ठाकरेंसाठी मैदान मोकळं केलेल्या नेत्याला शिवसेना आमदार करणार