यावेळी सुभाष देसाई यांनी आपण यंदा विधानपरिषद निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले. विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत. या दोन्ही जागेवर नव्या उमेदवारांना संधी मिळणार असून मी विधान परिषदेसाठी उमेदवार नाही, असे सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले. मी नाराज असण्याचा किंवा माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही. विधानपरिषदेचे उमेदवार निवडण्याच्या समितीमध्ये माझा समावेश आहे. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करूनच विधानपरिषद निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माझ्या इच्छेने नव्या उमेदवारांना संधी देण्यात आल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.
यावेळी सुभाष देसाई यांनी भाजपवरही टीकास्त्र सोडले. राज्यसभेची निवडणूक होईल तेव्हा आम्ही कितीतरी पुढे गेलेलो असू. भाजपने या निवडणुकीत उमेदवार उतरवून अपशकून केलाय. त्यामुळे २४ वर्षांमध्येच पहिल्यांदाच राज्यसभेची निवडणूक होत आहे. ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरण व्हावी, यासाठी आमच्या शिष्टमंडळाने भाजपच्या नेत्यांची भेट घेतली. भाजपने महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाचवली. आता त्यांना लढायचेच आहे तर आम्ही भाजपला त्यांची जागा दाखवू, असेही सुभाष देसाई यांनी म्हटले.
सुभाष देसाईंच्या मंत्रिपदाचं काय होणार?
आमशा पाडवी आणि सचिन अहिर यांना विधानपरिषदेवर पाठवले गेल्यास सुभाष देसाई यांना आमदारकीसोबत मंत्रिपदावरही पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. त्यानुसार येत्या सहा महिन्यांमध्ये मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतात. सुभाष देसाई यांच्यानंतर उद्योग खात्याचा कारभार सांभाळण्यासाठी नवा मंत्री मिळेपर्यंत हा कारभार आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवला जाऊ शकतो, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात आहे.