राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार चढाओढ सुरू आहे. आपले आमदार फुटू नयेत यासाठी सगळ्याच पक्षांकडून काळजी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपल्या आमदारांना व्हिप जारी केला आहे.

 

shiv sena issues whip for rajya sabha election
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हायलाइट्स:

  • शिवसेना आमदारांसाठी व्हिप जारी
  • राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं व्हिप काढला
  • राज्यसभेच्या ६ जागांसाठी १० जूनला मतदान
मुंबई: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना, भाजपमध्ये जोरदार चुरस आहे. अपक्ष आमदारांना, लहान पक्षांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी दोन्ही पक्ष कामाला लागले आहेत. त्यासोबतच आपल्या आमदारांची मतं फुटू नयेत यासाठी दोन्ही पक्षांनी काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेनं आपल्या आमदारांना व्हिप बजावला आहे. पक्षादेशाप्रमाणे मतदान करण्याच्या सूचना आमदारांना करण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आमदारांसाठी व्हिप जारी केला आहे.

राज्यसभा निवडणुकीचं मतदान शुक्रवारी दिनांक १० जून २०२२ रोजी सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत मध्यवर्ती सभागृह, चौथा मजला विधानभवन, मुंबई येथे घेण्यात येणार आहे. सदर निवडणुकीत शिवसेनेच्या विधानसभा सदस्यांनी मतदानात सहभागी व्हायचे असून सदस्यांनी शुक्रवार १० जून २०२२ रोजी शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालय, दुसरा मजला, कक्ष २१४, विधानभवन, मुंबई या दालनात मतदानाबाबतच्या सूचना घेण्याकरिता सकाळी ८ वाजता उपस्थित रहावे. आपल्याला देण्यात येणाऱ्या निर्देश व सूचनेप्रमाणे शिवसेना आमदारांनी मतदान पक्षादेशाप्रमाणे करायचे आहे, असं शिवसेनेच्या व्हिपमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
विधानपरिषदेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्याही उमेदवारांची नावे निश्चित; संपूर्ण यादी…
सध्या शिवसेनेच्या आमदारांचा मुक्काम मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये आहे. आमदारांची फोडाफोड होऊ नये यासाठी शिवसेनेकडून खबरदारी घेतली जात आहे. काल ट्रायडंटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना संबोधित केलं आहे. राज्यात अनेक वर्षांनी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्याची आपली परंपरा होती. मात्र भाजपमुळे ती यंदा मोडीत निघाली, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपला लक्ष्य केलं.
शिवसेनेकडून विधानपरिषदेत नव्या दमाच्या शिलेदारांना संधी, सुभाष देसाई म्हणाले…
राज्यात षडयंत्र रचलं जात आहे. त्याला बळी पडू नका. ही वेळ पाय घट्ट रोवून उभे राहण्याची आहे. बंगालमध्ये ममता दीदींनी ज्याप्रकारे भाजपला नेस्तनाबूत केलं, तेच आपल्याला करावं लागणार आहे. महाविकास आघाडी भक्कम आहे. आपले चारही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेची निवडणूकदेखील जिंकू. त्यानंतर पुन्हा आपण भेटू आणि सेलिब्रेशन करू, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : rajya sabha election 2022 shiv sena issues whip to all its mlas
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here