मुंबई: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजप एकमेकांसमोर उभे ठाकल्याने ही निवडणूक अटीतटीची झाली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्यादृष्टीने प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी बुधवारी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. मनसेच्या एकमेव आमदाराचे मतही या निवडणुकीत भाजपसाठी निर्णायक ठरू शकते. मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी आपण राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कोणाला मत द्यायचा याबाबत निर्णय घेऊ, असे म्हटले होते. हे मत आपल्या बाजूने वळवण्यासाठी आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, राज ठाकरे यांनी अद्याप याबाबत आपला निर्णय जाहीर केलेला नाही. परंतु, मनसेचे मत हे भाजपलाच पडेल, असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला. (Rajyasabha Election 2022)
पक्षादेशाप्रमाणे मतदान करा! राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी
राज ठाकरे यांची भेट घेऊन बाहेर पडल्यानंतर आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटलो. पक्षाच्यावतीने राज्यसभेसाठी मनसेचं असलेलं एक मत भाजपला मिळावे, यासाठी विनंती केली. आम्ही धन्यवाद व्यक्त करतो, आमच्या विनंतीला मान दिला, ते मत भाजपला पडेल असा विश्वास दिल्याचे शेलार यांनी म्हटले. मात्र, मनसेकडून अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. या भेटीवेळी मनसेचे आमदार राजू पाटीलही उपस्थित होते. त्यामुळे आता १० जूनला होणाऱ्या निवडणुकीवेळी काय घडणार, हे पाहावे लागेल.

तत्पूर्वी महाविकास आघाडीकडून मंगळवारी मुंबईत शक्तीप्रदर्शन करण्यात आले. ट्रायडंट हॉटेलमध्ये मविआच्या आमदारांची आणि अपक्ष आमदारांची बैठक झाली. या बैठकीला १२ अपक्ष आमदार उपस्थित होते. त्यामुळे आता भाजपला इतर लहान पक्ष आणि अपक्षांची मते मिळवणे गरजेचे आहे. त्यासाठी भाजपकडून सध्या धावपळ सुरु आहे. करोना झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे होम क्वारंटाईन आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत मतांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी आशिष शेलार, प्रसाद लाड आणि गिरीश महाजन या ‘त्रिमूर्ती’वर सोपवण्यात आली आहे.

अपक्ष आमदार आमच्याच बाजूने असतील, सतेज पाटलांचा विरोधकांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here