मुंबई : मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने करोनाची आजची आकडेवारी जाहीर केली असून कालच्या तुलनेत आज करोनाबाधीत नवीन रुग्णांची संख्या बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे. काल दिवसभरात मुंबईत करोनाच्या १८३ रुग्णांची नोंद झाली होती. तुलनेने आज दिवसभरात करोनाचे १०७ रुग्ण आढळले आहेत. मृत्यूचे प्रमाणही स्थिर दिसत असून काल दोन जणांचा तर आज तीन जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

मुंबईत करोना रुग्णसंख्या दोन हजाराच्या पुढे गेली आहे. आज १०७ नवे करोनाबाधीत रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या २०४३ इतकी झाली आहे. ११६ मृत्यू धरून ही रुग्णसंख्या असल्याने प्रत्यक्षात रुग्णांची संख्या अद्याप दोन हजारच्या आत आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ३ रुग्ण दगावले असून त्यातील दोघांना दीर्घकालीन आजार होते तर एक रुग्ण वयोवृद्ध होता.

आज २१ जण करोनामुक्त

मुंबईकरांसाठी मोठी दिलासा देणारी बाब म्हणजे करोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. काल १७ रुग्ण करोनामुक्त झाले होते तर तुलनेत आज २१ जणांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत २०२ रुग्णांनी करोनाविरुद्धची लढाई जिंकण्यात यश मिळवले आहे.

विलगीकरणातील अन्य रुग्णांचा तपशील पाहता आज करोना सदृष्य लक्षणे असलेले आणखी २९९ रुग्ण दाखल झाले आहेत. अशा रुग्णांची संख्या आता ५६७८ इतकी झाली आहे. ही आकडेवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंतची असल्याचे मुंबई पालिकेच्या साथरोग कक्षाचे उपकार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांनी नमूद केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here