Maharashtra Covid Update | Corona Reports of all 45 Employees from Health Department are Negative | करोनासंदर्भात दिलासादायक बातमी, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याने चिंता मिटवली
हिंगोली : राज्यात एककीडे करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढत आहे. पण दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातून एक दिलासादायक बातमी आली आहे. हिंगोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील एक कर्मचारी करोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आरोग्य विभागाचे कार्यालय निर्जंतुक करण्यात आलं. त्यानंतर विभागातील ४५ जणांच्या स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचे अहवाल आज बुधवारी प्राप्त झाले असून सगळे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास सोडला.
पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याला उपचारासाठी शासकिय रुग्णालयाच्या कोव्हिड विभागात भरती करण्यात आलं आहे. त्यास कुठलंही गंभीर लक्षणं नसल्याचं रुग्णालयाच्या सुत्रांनी सांगितलं. इतर सर्व कर्मचाऱ्यांचा करोना अहवाल निगेटिव्ह आला असला तरी कर्मचाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदमध्ये येणाऱ्या नागरिकांनी मास्क घालूनच जिल्हा परिषदमध्ये प्रवेश करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. Monsoon News 2022 : महाराष्ट्राला पावसाची वाट पाहावी लागणार, वाचा कुठे पोहोचला मान्सून? काळजीचं कारण नाही
जिल्ह्यात आरोग्याच्या बाबतीत सर्व परिस्थितीचा सामना करण्यास आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. त्यामुळे नागरीकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. मात्र, गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनीदेखील प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून मास्क वापरावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.