संगमनेर: लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना धान्य पुरवठा करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असताना, अहमदनगरच्या सरकारी गोदामातून अकोले तालुक्यात जात असलेल्या तांदळाला मध्येच पाय फुटले असून, संगमनेर शहरानजीक पोलिसांनी या तांदळाचा सुरू असलेला काळाबाजार रोखला आहे. मात्र तीन दिवस उलटूनही शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे बोलले जात आहे.

एका ट्रकद्वारे हा तांदूळ अकोल्याला नेला जात होता. दरम्यान या ट्रकमधून तांदळाच्या काही गोणी गायब करण्यात येत असल्याची माहिती शहर पोलिसांना समजली. पोलिसांनी मंगळवारी (१४ एप्रिल) पहाटे तातडीने पंचायत समिती परिसरात जाऊन माहितीची खातरजमा केली असता, ट्रकमधून पाच ते सहा तांदळाच्या गोण्या एका लहान टेम्पोमध्ये टाकल्या जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी ट्रक आणि टेम्पोसह दोघांना ताब्यात घेतले असून, या संदर्भात महसूल प्रशासनाला माहिती दिली. महसूल प्रशासनाने संबंधित मालाची तपासणी केली असता, हा सर्व माल रेशनचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी पोलिसांना तसे स्पष्ट करत संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र यासंदर्भात गुरुवारी संध्याकाळपर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.

दरम्यान यासंदर्भात बोलताना अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे म्हणाले, ‘पाच-सहा दिवसांपूर्वी रेशन वाटपासंदर्भात तहसीलदार मुकेश कांबळे आणि पुरवठा अधिकारी यांच्याशी झालेल्या बैठकीत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. सामान्य माणसाची उपासमार होईल अशा प्रकारचे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही. मात्र आज धान्याचा काळाबाजार होत असल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. यात जे कोणी सामील असतील त्यांचा शोध घेतला जाईल. करोनाच्या संकटकाळात अकोले तालुक्याची प्रतिमा खराब करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून हा काळाबाजार केव्हापासून सुरू आहे याची चौकशी केली जाईल. तांदूळ घेऊन निघालेले ट्रक अकोल्याच्या शासकीय गोदामापर्यंत का पोहोचले गेले नाहीत, याची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here