कोणीतरी उच्चारलेल्या काही शब्दांमुळे धर्माबद्दलची श्रद्धा कमी होईल, इतका कोणताच धर्म कमजोर नसतो, असं चतुर्वेदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. मध्य पूर्वेतील देशांनी अल कायदासारख्या मुस्लिम दहशतवादी संघटनांकडून दिल्या जाणाऱ्या धमक्यांचादेखील निषेध करावा, अशा शब्दांत चतुर्वेदींनी मुस्लिम देशांना सुनावलं. मोहम्मद पैगंबर यांच्या अपमानाचा बदला घेण्याची धमकी अल कायदाकडून देण्यात आली आहे. त्यानंतर चतुर्वेदींनी थेट मध्य पूर्वेतील देशांवर शरसंधान साधलं.
प्रियंका चतुर्वेदींनी याआधी भाजप नेतृत्त्वावर या प्रकरणी टीका केली आहे. नुपूर शर्मा प्रकरणातील संपूर्ण घटनाक्रम दुर्दैवी असल्याचं चतुर्वेदींनी म्हटलं. परराष्ट्र मंत्रालयाला हस्तक्षेप करण्यास सांगून सरकारनं चूक केल्याचं त्या म्हणाल्या. ‘आपल्याला १३ देशांना स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. मुस्लिम देशांनी विरोध दर्शवल्यानं भाजप नेतृत्त्वाला प्रवक्त्यांवर कारवाई करावी लागली. सत्ताधारी पक्षानं आपल्याच प्रवक्त्यांच्या विधानांपासून फारकत घेण्याची वेळ पहिल्यांदाच आली. हा संपूर्ण प्रकार दुर्दैवी आहे,’ अशा शब्दांत चतुर्वेदींनी भाजपला लक्ष्य केलं.
नुपूर शर्मांच्या विधानाचा निषेध करत दहशतवादी संघटना अल कायदानं भारताला हल्ल्याची धमकी दिली आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, मुंबई आणि दिल्लीमध्ये हल्ले घडवण्याचा इशारा अल कायदानं दिला. ज्या लोकांनी पैगंबरांचा अपमान केला आहे, त्यांना आम्ही सोडणार नाही. मानवी बॉम्बच्या माध्यमातून मुस्लिम याचा बदला घेतील, अशी धमकी अल कायदाकडून देण्यात आली आहे.