आरोपी नर्सचा पालीच्या धरणात संशयास्पद मृतदेह
मिळालेल्या माहितीनुसार, अवैध गर्भपात केल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या नर्सने पालीच्या बिंदुसरा धरणात आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सीमा डोंगरे या खाजगी रुग्णालयात नर्स होत्या आणि त्यांनी एका महिलेच्या घरी जाऊन गोठ्यात गर्भपात केल्याचे समोर आले होते. बीड तालुक्यातील बक्करवाडी येथील शीतल गाडे या महिलेचा अवैध गर्भपात करण्यात आला होता. त्यानंतर अति रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी पती, भाऊ यांच्यासह गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरसह सीमा डोंगरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बीडच्या पोलीस प्रशासन आणि आरोग्य प्रशासनाने कसली कंबर
दरम्यान, या प्रकारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत असून आता बीडच्या पोलीस प्रशासन आणि आरोग्य प्रशासनाने कंबर कसली आहे. आता हे रॕकेट कशा प्रकारे चालते, कोण चालवते ह्या सगळ्या गोष्टींचा छडा लावण्यासाठी पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाने मोठ्या प्रमाणात यंत्रणा सज्ज केली असून हा सगळा तपास सुरू असल्याचे डॉक्टर सुरेश साबळे यांनी यावेळी सांगितले. मात्र, सुदाम मुंडेनंतर अशा प्रकारचे घटना पुन्हा उघडकीस होत असल्याने या गोष्टीकडे आता गांभीर्याने लक्ष दिले जात आहे. आता या रॅकेटचा पर्दाफाश कशा पद्धतीने होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.