औरंगाबाद: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेची सुरुवात दणक्यात झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणापूर्वी शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणांमधून भाजपवर जोरदार प्रहार केले. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी उद्धव ठाकरे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी नारायण राणे यांच्यावर शरसंधान साधले. सुभाष देसाई यांनी औरंगाबादमधील पाणी योजनेबद्दल माहिती दिली. ही योजना बराच काळापासून रखडली होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पाणी योजनेच्या कंत्राटदाराला बोलावून तंबी दिली. उद्धव ठाकरे यांनी बैठका घेऊन या योजनेतील अडथळे दूर केले होते. त्यानंतर आता पाणी योजनेचे काम रखडले किंवा मंदावले तर तुला तुरुंगात टाकेन, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. अरे ज्या उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना सोडले नाही, त्यांना तुरुंगाची हवा खायला लावली. ते असताना कोण कुठला ठेकेदार योजना रखडवू शकत नाही, असे सुभाष देसाई यांनी म्हटले. (Shiv Sena Supremo Uddhav Thackeray rally in Aurangabad)
संभाजीनगरसाठी दिल्लीत ताकद लावायची सोडून भाजप नेते इथं फुगडी घालतात : सुभाष देसाई
औरंगाबाद शहराचा पाणी तुटवडा दूर व्हावा यासाठी १६८० कोटी रुपयांची योजना येत्या दोन वर्षांमध्ये पूर्ण होईल. उद्धव ठाकरे यांनी तंबी दिल्यानंतर कंत्राटदार औरंगाबाद महानगरपालिकेकडे धावत आला. त्याने पालिकेला लिहून दिले की, जायकवाडी ते औरंगाबाद ही योजना दोन वर्षांमध्ये पूर्ण करेन. यानंतर औरंगाबादकरांना धो-धो पाणी मिळेल. नागरिकांना शुद्ध आणि हवं तेवढं पाणी मिळण्यासाठी आता फक्त दोन वर्ष कळ सोसावी. सध्या औरंगाबादमध्ये पाण्याचा तुटवडा असल्याने महानगरपालिकेने पाणीपट्टी कमी केली आहे. ही पाणीपट्टी ४००० रुपयांवरून दोन हजार रुपयांवर आणण्यात आली, म्हणजे पाणी दरात ५० टक्क्यांची कपात झाली, याकडे सुभाष देसाई यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमधील आजची सभा ऐतिहासिक अशीच आहे. मैदानात पुरेशी जागा नसल्यामुळे अन्यत्र दोन ठिकाणी स्क्रीन्स लावून जवळपास ५ ते ७ हजार लोक बसवले आहेत. या सभेला झालेल्या गर्दीने शिवसेनेचेच यापूर्वीचे विक्रम मोडीत काढले आहेत, असेही सुभाष देसाई यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here