नवी दिल्लीः अँटी-बॉडी आणि करोनाच्या संसर्गाबाबत आज मोठी माहिती दिलीय. कुठल्याही व्हायरसने एखाद्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश केल्यावर त्याच्या शरीरात अँटी-बॉडी (प्रतिकारशक्ती) तयार होतात. तुम्ही करोनामुक्त झालाय आणि पुन्हा तुम्हाला करोनाचा संसर्ग झाल्यावर शरीरात अँटी-बॉडी तयार होऊन त्यावर मात करतीलच असं नाही. त्यामुळे करोनाचा पुन्हा संसर्ग होण्यापासून काळजी घेतलीच पाहिजे, असं आयसीएमआरचे डॉ. रमण गंगाखेडकर यांनी स्पष्ट केलंय.

आपल्या शरीरात एखादा विषाणू घुसल्यास त्याच्याविरोधात लढण्यासाठी शरीर प्रतिकारशक्ती तयार करतं ज्याला शास्त्रीय भाषेत अँटी-बॉडी म्हणतात. अँटी-बॉडी या व्हायरसच्या उलट काम करतात. व्हायरसला शोधून त्या त्याला चिकटतात आणि त्याला संपवतात. शरीरात अँटी बॉडी विविध प्रकारच्या आहेत. एक आहे आयजीएम ज्या शरीरात फार दिवस राहत नाहीत. काही दिवसात निघून जातात. आयजीएम अँटी बॉडी आढळून आल्या की समजावं संसर्ग काही वेळापूर्वीच झाला आहे. आणि आयजीजी अँटी बॉडी तयार होतात त्यावेळी शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढलीय, असं स्पष्ट होतं. पण फक्त आईजीजी अँटी बॉडी दिसत असतील आणि आयजीएम दिसत नसतील तर संसर्ग होऊन बराच काळ झालाय, असं समजलं जातं.

भारतात ५ लाख करोना रॅपिड टेस्ट किटः ICMR

चीनमधून मागवण्यात आलेले ५ लाख रॅपिड टेस्ट किट भारतात दाखल झाले आहेत. दोन प्रकारचे रॅपिड टेस्ट किट आले आहेत. दोन्ही मिळून ५ लाख टेस्ट किट आहेत. ल्यूजॉन आणि वॉनफ्लो असे हे किट आहेत. दोन्ही किटची सेंसेटिव्हीटी ही ८० टक्के आहे. हे दोन्ही सिरॉलॉजिक किट्स आहेत. ज्यांना काही कालावधीपूर्वी करोनाची लागण झालीय हे त्यांचा आजार रॅपिड टेस्ट किटने समोर येईल. लगेचच लागण झालेल्यांचे निदान हे रॅपिड टेस्ट किटमधून समोर येत नाही. यामुळे रॅपिड टेस्ट किटचा उपयोग हा रोग तपासण्यासाठी होत नाही. तर कुठल्या भागात व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतो आहे किंवा नियंत्रणात आहे, यासाठी रॅपिड टेस्ट किट्स उपयोगात येतात, असं आयसीएमआरचे डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितलं.

आयसीएमआरने आतापर्यंत २ लाख ९० हजारांहून अधिक करोना चाचण्या केल्या आहेत. यापैकी ३० हजार ०४३ चाचण्या बुधवारी करण्यात आल्या. पुढचे ८ आठवडे चाचण्या करता येतील इतक्या किटचा साठा आपल्याल्याकडे उपलब्ध असल्याचं, गंगाखेडकर यांनी सांगितलं.

दरम्यान, देशातील करोना रुग्णांची संख्या वाढून १२, ७५९ इतकी झालीय. तर एकूण ४२० जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १४८९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here