औरंगाबाद : औरंगाबाद शहराचा पाणी प्रश्न सोडवणार, शहर पहिल्यांदा सोयीसुविधांनी अद्ययावत करणार, रस्ते-पाणी-रोजी रोटीचा प्रश्न सोडवणार आणि नंतर शहराचं नामांतर करणार, अशी भूमिका मांडत सर्वसामान्यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत भाष्य केलं. त्याचवेळी हिंदुत्व आणि काश्मिरी पंडितांच्या हत्येवरुन ठाकरी शैलीत मुख्यमंत्र्यांनी भाजपचा समाचार घेतला. यावेळी ते औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील, औरंगजेबाच्या थडग्यावर फुलं वाहणारे एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर प्रहार करतील, असं बोललं जात होतं. मात्र राज्यसभा आणि विधान परिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी एमआयएम-जलील-ओवेसी यांच्यावर टीका करणं टाळलं.

औरंगादाबादेत ३७ वर्षांपूर्वी शिवसेनेची शाखा स्थापन झाली होती. त्याच शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर विराट सभा पार पडली. या सभेला जवळपास २५ हजार शिवसैनिकांनी गर्दी केली होती. “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो”, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. तेव्हा टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. “ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते”, असा वार त्यांनी भाषणाच्या पहिल्याच मिनिटाला भाजपवर केला. त्यांच्या भाषणातला आक्रमकपणा पाहून ते स्थानिक एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांचा समाचार नक्की घेतील, औरंगजेबाच्या थडग्यावर फुलं वाहणाऱ्या ओवेसींवर प्रचंड हल्लाबोल करतील, असं सगळ्यांना वाटलं. पण भाषणातली केवळ एक ओळ ओवेसींवर खर्च करत अतिविराट सभेत एमआयएमविरोधात सौम्य होणं मुख्यमंत्र्यांनी पसंत केलं.

जलआक्रोश योजनेवरून मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

मुख्यमंत्र्यांनी MIM आणि ओवेसींवर जाहीरपणे टीका करण्याचं टाळलं!

राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यात छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या मतांची जुळजुळव करताना सेनेची चांगलीच पळापळ झाली. त्यातही राज्यसभेला मदत पाहिजे असेल तर थेट संपर्क करा, अशी गुगली टाकून एमआएमएने सेनेची गोची केली. त्यानंतर सेना नेते तथा कृषिमंत्री दादा भुसे यांनी एमआयएम आमदार शाह यांची भेट घेऊन मदतीचं आवाहन केलं. म्हणजेच सेना उमेदवार जिंकून यायचा असेल तर एमआयएमची दोन मतं गेमचेंचर ठरु शकतात, हे सेनेला माहिती आहे. त्याच कारणाने उद्धव ठाकरेंनी आज एमआयएम आणि ओवेसींवर जाहिरपणे टीका करण्याचं टाळलं.

गळ्यात भगवं उपरणं, तेजस ठाकरेंची एन्ट्री, औरंगाबादेत शिवसेनेच्या ‘छाव्या’चं लाँचिंग?
एरव्ही भाजपची बी टीम म्हणून हिणवणाऱ्या एमआयएमला आज सेना नेत्यांनी अंगावर घेतलं नाही. “मराठवाडा कुणाचा आहे, हे सांगण्यासाठी आजची सभा पुरेसी आहे”, म्हणत राऊतांनी आटोपतं घेतलं. एकंदरितच ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एमआयएम-ओवेसींवर ठाकरी शैलीत तोफ डागतात, ती तोफ मात्र MIMविरोधात धडाडली नाही, अशी चर्चा समाजमाध्यमांवर सुरु होती.

जे जलील बोलत होते, तेच आज उद्धव ठाकरे बोलले, नामांतरावर सेना-MIM चा सुरात सूर?
नामांतरावर सेना-MIM चा सुरात सूर

बरं उद्धव ठाकरे यांचं भाषण आटोपताच एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचं कौतुक केलं. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादेत येऊन चांगलं भाषण केलं, असं जलील म्हणाले. नामांतराविषयी जे कालपर्यंत जलील बोलत होते, तेच आज उद्धव ठाकरे बोलले. त्यामुळे नामांतरावर सेना-MIM चा सुरात सूर असल्याचंही पाहायला मिळालं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here